पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
मिकी घई, एबीपी माझा, पुणे October 06, 2024 02:13 PM

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरूणीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटने घडली आहे. या घटनेनंतर आता पुण्यातील प्रशासन आणि पोलिसांना जाग आल्याचं दिसून येत आहे. या घटनेनंतर आता पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट आणि सायरन बसवले जाणार असल्याची माहिती आहे. 

पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर बसवण्यात येणाऱ्या सर्च लाईट आणि सायरन आपत्कालीन परिस्थितीत महत्वाचा ठरणार आहे, बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे अशी माहिती आहे, तर अशा निर्जन स्थळी अनेकदा दारू पार्ट्या, गुन्हे, आणि विविध प्रकारच्या घटना घडल्याची माहिती आहे, तर काही महिन्यांआधी पुण्यातील वेताळ टेकडीवरती दोन विद्यार्थींंनी अमली पदार्थांच्या नशेत असल्याची घटना समोर आली होती. अशी प्रकारांना आळा बसावा यासाठी आता प्रशासन आणि पोलिस जागे झाले आहेत. 

नीलम गोऱ्हे यांचा पोलिसांना आदेश

पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्यावत करावे. तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याची वेळोवेळी देखरेख व्हावी. याबाबतची माहिती सुरक्षितेतेच्या दृष्टिने नागरिकांना होणे गरजेचे आहे. यासाठी पुरेशी प्रसिद्धी द्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.  

गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहापाई गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. यांचेवर विविध प्रकारे वचक ठेवणे आवश्यक आहे. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावी.यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निमुर्लन कक्ष, अंध श्रृद्धा निमुर्लन कक्ष  तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे, असं विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.