मराठी साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
Marathi October 07, 2024 01:24 AM

प्रतिनिधी / पुणे

सरहद, पुणे आयोजित दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलन २१,२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडीअम, दिल्ली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक संपन्न झाली. अध्यक्ष उषा तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या बैठकीस अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर यावेळी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत होणार आहे.

या संमेलनात खालील विषयावर परिसंवाद होणार आहे.

परिसंवादाचे विषय :

1) देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य

2) मराठी आणि महाराष्ट्र धर्म

3) लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद

4) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता

5) बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन

6) मराठीचा अमराठी संसार

7) परिचर्चा – “आनंदी गोपाळ” या पुस्तकावर

8) अनुवादावर परिसंवाद

9) मधुरव – हा विशेष कार्यक्रम

दोन कविसंमेलने : 1) बहुभाषिक कविसंमेलन 2) निमंत्रितांचे कविसंमेलन

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.