कानगावत दरोडा टाकणाऱ्या दोघांना अटक
esakal October 07, 2024 06:45 AM

कानगाव, ता.६ : कानगाव (ता.दौंड) येथील पाटस रेल्वे स्टेशन जवळील शेतामध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीमधील दोघांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली आहे. या दरोडेखोरांविरोधात यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धू रसिकलाल चव्हाण (रा.इनामगाव, ता.शिरूर) व बाबूशा गुलाब काळे रा.शेडगाव ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शनिवार (ता.४) रात्री साडेनऊच्या सुमारास काही सशस्त्र दरोडेखोर एका शेतात लपले असल्याचे एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. संबंधित ग्रामस्थांने कानगाव मधील ग्रामस्थांना बोलावून घेतले. यावेळी ग्रामस्थांनी या दरोडेखोरांचा शेतात शोध घेतला. तेव्हा ते दरोडेखोर पळून जाऊ लागले. यावेळी एका दरोडेखोराला ग्रामस्थांनी पकडले. उर्वरित दरोडेखोर पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी एका उसाच्या शेतातील पाचट जळत होते. याप्रसंगी जळत असलेले पाचट दरोडेखोरांनी उचलले आणि ग्रामस्थांना म्हणाले. आम्ही आमच्या दुचाकी जाळून टाकू व तुम्हाला गुंतवून टाकू अशी धमकी ग्रामस्थांना देत दरोडेखोरांनी दोन दुचाकी जाळल्या त्यानंतर दरोडेखोर पळून जात असताना दरोडेखोर व ग्रामस्थांमध्ये झटापटी झाल्या. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्या हातात असलेले कोयते ग्रामस्थांवर उगारले.
याबाबत पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे यांनी फिर्याद दिल्याने पाच दरोडेखोराविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.

00337

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.