आत्मनिर्भर वायुदल हेच द्यायचे! – तरुण भारत
Marathi October 09, 2024 11:24 AM

वायूदल दिनी प्रमुखांचा निर्धार, वायूदलाच्या 92 व्या स्थापनादिनानिमित्त शानदार कार्यक्रम

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या पराक्रमाचा महत्वाचा मानबिंदू असणाऱ्या भारतीय वायुदलाचा 92 वा स्थापना दिन शानदार प्रकारे साजरा करण्यात आला आहे. आपल्या आवश्यकता देशातच पूर्ण करुन आत्मनिर्भर होणे हेच वायुदलाचे ध्येय आहे, असा निर्धार या निमित्त संदेश देताना वायुदल प्रमुख मार्शल अमरप्रीत सिंग यांनी व्यक्त केला.

भारतासमोर मोठी आव्हाने आहेत. आपल्या सीमांचे संरक्षण हे सेनादलांचे आद्य कर्तव्य आहे. आपली वायुसेना अतिशय सक्षम आहे. मात्र, ती अधिक भक्कम होण्याची आवश्यकता आहे. वैश्विक सुरक्षा वातावरण आता सारखे परिवर्तीत होत आहे. नवेनवे तंत्रज्ञान सुरक्षा क्षेत्रात येत आहे. भारतालाही या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन आपली संरक्षण क्षमता अद्यायवत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. यासाठी आत्मनिर्भरता हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महान हवाई हालचाल

वायुसेना दिनाच्या निमित्ताने तांबरम येथील पटांगणावर वायुसैनिकांनी शानदार संचलन आयोजित केले होते. वायुसेनाप्रमुखांनी या संचलनाचे निरीक्षण केले. संरक्षण क्षेत्रात सातत्याने होणारे परिवर्तन लक्षात घेतला आता आपल्या सर्वांना पारंपरिक विचारपद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक युद्धतंत्र यांचा स्वीकार करणे आणि या दोन्ही बाबी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. भारतीय वायुदल सातत्याने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर असून देशाच्या संरक्षणासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वातावरणात सज्ज आहोत. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कार्य करण्याची आमची क्षमता असून आमच्या प्रतिस्पर्ध्यांना याची कल्पना आहे, असे प्रतिपादन सिंग यांनी यावेळी केले.

यावेळेचे घोषवाक्य

यंदा भारतीय वायुसेनेने ‘भारतीय वायुसेना : सक्षम, शक्तीशाली, आत्मनिर्भर’ हे घोषवाक्य स्वीकारले आहे. हे घोषवाक्य आमचा आत्मविश्वास दर्शवून देते. भारतीय वायुदलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची सक्षमता अधिकाधिक वाढविण्याचा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालविला आहे. या प्रयत्नांमध्ये आम्हाला यश येत असून भविष्यकाळात आमच्या शूरवीर वायुसैनिकांच्या अतुलनीय पराक्रमाला आणि धैर्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ देऊन भारतीय वायुदल जगात सर्वोत्तम बनविण्याच्या दिशेने वाटचाल आम्ही करत आहोत, असा आत्मविश्वास सिंग यांनी प्रगट केला.

संरक्षणासमवेत राष्ट्रीय कर्त्यव्यही…

भारतीय वायुसेना आपल्या सीमांच्या संरक्षणाचे कार्य तर तन्मयतेने करीत आहेच, तसेच राष्ट्रीय आपदांच्या काळात आपले सामाजिक कर्तव्यही उत्तम प्रकारे पाड पाडत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर अन्य देशांमध्येही नैसर्गिक आपदा आणि विपरीत काळात आम्ही तेथील जनतेला साहाय्य करण्याची मानवीय भूमिकाही यशस्वीरित्या पार पाडली आहे, असे प्रतिपादन सिंग यांनी केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.