Police Crime: पोलिस दलातील 'त्या' पाच पोलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबित
esakal October 09, 2024 01:45 PM

Navi Mumbai News: गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या टेम्पोचालकाला दमदाटी करत त्याच्याकडून तीन हजार रुपये उकळणाऱ्या नवी मुंबई पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

स्वप्नील देवरे, विशाल दखणे व सचिन बोरकर अशी या तीन पोलिसांची नावे आहेत. त्याच्यावर नेरूळ पोलिस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. घटनेवेळी या तिघांसोबत पोलिस वाहनामध्ये असलेल्या इतर दोन पोलिसांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसला, तरीदेखील त्यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले.

निलंबित करण्यात आलेले पाचही पोलिस कर्मचारी नवी मुंबई पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. सर्व आरोपी शनिवारी (ता. ५) हे पोलिस सेवेतील चारचाकीतून वाहनातून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऐरोली येथे एका व्हीआयपीला घेण्यासाठी जात होते.

यावेळी त्यांचे वाहन उरण फाटा येथे आले असताना, त्यांनी गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी जात असलेल्या विक्रम खोत या टेम्पोचालकाला त्यांनी अडवले. त्यानंतर त्यांनी विक्रमकडे गाडी व्यवस्थित चालवत नसल्याचे सांगत त्याला दमदाटी करून त्याचा वाहन परवाना घेतला. यातील तीन आरोपींनी त्याला रेयॉन इंटरनॅशनल शाळेजवळ नेत टेम्पोचे पासिंग व पीयूसी संपल्याचे सांगत २० ते २५ हजार रुपये दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवत पैशांची मागणी केली.

यावेळी विक्रम खोत याने आपल्याकडे फक्त १,७०० रुपये असल्याचे सांगितले. तर, विक्रमसोबत असलेल्या हेल्पर नितीन याने त्याच्याकडे १०० रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींकडे विक्रमने २०० रुपये आपल्याला राहू देण्याची विनंती केल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडून १,५०० रुपये घेतले. त्यानंतर विशाल दखणे याने रस्त्याने जाणाऱ्या एका रिक्षाचालकाला थांबवून रिक्षाचालकाच्या मोबाईलवर विक्रमला दीड हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले.

त्यानंतर विक्रमने या प्रकाराची माहिती आपल्या गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाला दिल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार विक्रमने सोमवारी (ता. ७) नेरूळ पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

आरोपी तीनही पोलिसांवर नेरूळ पोलिस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच पोलिस वाहनांत असलेल्या दोघांसह अशा एकूण पाच पोलिसांवर याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

इतर दोन पोलिसांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसला तरी त्यांनादेखील याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

- संजयकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त, नवी मुंबई पोलिस मुख्यालय
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.