राजापूर- उबाठाच्या स्थानिक नेतृत्वावर आम्ही नाराज
esakal October 10, 2024 12:45 AM

17541

शिवसेना ठाकरे गट स्थानिक नेतृत्वावर नाराज
प्रकाश कुवळेकर, दुर्वा तावडेः शिंदे गटाचे काम करणार असल्याचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ः राजापूर विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या (उबाठा) स्थानिक नेतृत्वावर आपण नाराज आहोत. विधानसभा मतदार संघात गेल्या १५ वर्षापासून अनेक विकासकामे रखडलेली आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघाचा विकास व्हायचा असेल बदल आवश्यक आहे, असे शिवसेनेचे (उबाठा) विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक आणि माजी सभापती दुर्वा तावडे यांनी सांगितले.
राजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश कुवळेकर, दुर्वा तावडे यांनी शिंदे शिवसेनेला पाठबळ देत असल्याचे जाहीर केले तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उबाठा शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर केलेल्या वक्तव्यामुळे राजापूर विधानसभा मतदार संघात अंतर्गत नाराजी आणि कुरबुरी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे तसेच मतदार संघाच्या रखडलेल्या विकासाला ठाकरे शिवसेनाच जबाबदार असल्याचा ठपकाही ठेवला जाऊ लागला आहे. या वेळी उबाठाच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचेही जाहीर केले.
राजापूर शहरातील या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, विधानसभा प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख दीपक नागले, शहरप्रमुख सौरभ खडपे, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, माजी नगरसेवक संजय ओगले आदी उपस्थित होते. या प्रसंगी पालकमंत्री सामंत म्हणाले, शिवसेनेतील शिंदे गट हीच खरी शिवसेना असून, या पक्षाची ताकद वाढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे; मात्र ३५ वर्षाहून अधिक काळ संघटनेसाठी वाहून घेतलेले पदाधिकारी पक्ष का सोडतात याचे आत्मचिंतन करा, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.