Ulhasnagar : उल्हासनगरात स्कायवॉकची एक एन्ट्री वगळता सर्व एन्ट्री उद्यापासून दुरुस्तीसाठी राहणार बंद
esakal October 10, 2024 04:45 AM

उल्हासनगर - चौदा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या सभोवतालच्या स्कायवॉक अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांसाठी चांदीबाई कॉलेजच्या दिशेची एन्ट्री वगळता बाकी सर्व एन्ट्री उद्या गुरुवार 10 तारखेपासून बंद करण्यात येणार आहे.

2008 साली रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या स्कायवॉकचे काम 2010 मध्ये पूर्ण झाले. त्यासाठी 34 कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला होता.मात्र कालांतराने हाच स्कायवॉक तुटलेल्या फरश्या, ढासळणारे पिलर्स,तुटलेले रेलिंग्स, आणि तोडफोड झालेल्या छप्परमुळे धोकादायक स्थितीत आला.

पण उल्हासनगर महापालिका आणि एमएमआरडीए दोघेही दुरुस्तीबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते.यासंदर्भात एक हात मदतीचा या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कदम यांनी स्कायवॉक नेमका कुणाच्या ताब्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

तेव्हा हा स्कायवॉक महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले. याबाबत विजय कदम यांनी आयुक्त विकास ढाकणे यांना पत्र दिल्यावर संरचनात्मक अभियंता रिषभ कर्नाबट यांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये स्कायवॉक धोकादायक अवस्थेत असल्याचा अहवाल सादर केला.

त्यानुसार स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात 3 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्याकरिता आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच दुरुस्तीच्या कामास सुरवात केली जाणार आहे.तोपर्यंत चांदीबाई कॉलेज मधून विद्यार्थी स्थानकावर येतात.त्यांच्यासाठी केवळ हीच एन्ट्री सुरू ठेवण्यात येणार असून बाकी सर्व एन्ट्री बॅरिगेट लावून बंद करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता तरुण शेवकानी यांनी दिली.

हाच स्कायवॉक सध्या गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. अंधाराचा फायदा घेत पादचाऱ्यांना लुटणे,मारहाण करणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्यावर देखील या ठिकाणी हल्ला झाला होता. याशिवाय एका अल्पवयीन मुलीवर शारिरीक अत्याचार झालेला आहे.

दुरूस्तीच्या कामास सुरवात होईपर्यंत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तसेच सातत्याने गस्त वाढवण्यासाठी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती एक हात मदतीचा या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय कदम यांनी दिली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.