आनंद पाककलेचा
esakal October 10, 2024 11:45 AM

- दीप्ती केतकर

मला स्वयंपाक करायला फार आवडतं; पण मी शाळेत असल्यापासून आईनं कधी स्वयंपाकघरात जाऊ दिलं नाही. ती नेहमी म्हणायची, ‘तू अभ्यास, खेळ, बाकी सगळं कर; पण स्वयंपाकघरात नको येऊस!’ मात्र, मला एक सवय होती, तिनं कोणता पदार्थ केला, की मी खाल्ल्यावर याच्यात कोणते पदार्थ घातलेस, मग कुठला मसाला घातला आहे, कांदा आहे का, असं विचारायचे आणि मोठी होत गेले, तसं आई स्वयंपाक करताना तिच्या बाजूला उभी राहून लक्ष द्यायची.

ती काय करते, कोणते घटक घालते, हे मी नीट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये मैत्रिणींच्या घरी कधीतरी राहायला गेले, तर तिकडे तिची आई काहीतरी पदार्थ करत असतानाही बाजूला उभी राहून त्यांना मदत करणं आणि त्या कशा पद्धतीनं स्वयंपाक करतात ते पाहायची.

माझ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतांतल्या मैत्रिणी होत्या. कोण राजस्थानी, कोण बिहारी, कोण पंजाबी. प्रत्येकीच्या घरी गेल्यानंतर मी त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीनं पदार्थ तयार केला जातो, काय काय मसाले वापरले जातात या गोष्टी बघायला लागले. मला स्वयंपाकाच्या या सगळ्या गोष्टींतून आनंद मिळू लागला, मला ते आवडू लागलं.

त्यामुळे स्वयंपाक करणं हा मला माझा छंद वाटू लागला. छंद तोच असतो जो तुम्हाला आनंद देतो. मला स्वयंपाकाच्या रूपात माझा छंद सापडला. स्वयंपाक करताना तो मी अगदी मनापासून आणि स्ट्रेस फ्री होऊन करते. स्वयंपाक करणं हे मला कधी कामासारखं किंवा ओझं वाटत नाही.

लग्न झाल्यावर आम्ही अमेरिकेला असताना आणि मला वाटतं त्या आधीही आई नसताना बाबांसाठी मी स्वयंपाक करणं किंवा लग्नानंतर नवऱ्यासाठी स्वयंपाक करणं मला आवडायचं. फक्त प्लेटिंग डेकोरेशन नव्हे, तर पदार्थ करायला आणि खाऊ घातल्यावर समोरच्याचा आनंद बघितल्यावर अजून मजा यायची. मला एकंदरीत कळलं, की यामुळे मला आनंद मिळतो.

आपण म्हणतो ना कोणाला पुस्तक वाचायला, कोणाला फिरायला जायला आवडतं तसं मला स्वयंपाक करायला आणि खाऊ घालायला प्रचंड आवडतं. हा माझा छंद आहे कारण मला तो आनंद देतो. आताही मी घरी असले, की एक पदार्थ कधीच करत नाही.

मी कमीत कमी तीन-चार पदार्थ करते आणि स्वयंपाकासाठी मदतनीस येत असते, तिच्याकडून मदत घेत असते. सुट्टीच्या दिवशी तर सकाळ-संध्याकाळचा नाश्ता आणि स्वयंपाक पूर्ण मीच करत असते. त्या व्यतिरिक्त पिझ्झा, पास्ता करायला आणि बेकिंग करायला मला फार आवडतं.

मला महाराष्ट्रीयन पद्धतीचा स्वयंपाक करायला प्रचंड आवडतो; पण त्याचबरोबर मला कॉन्टिनेन्टल पदार्थ करायला फार आवडतात; म्हणजे राजमा, दाल-बाटी हे मी फार आवडीनं बनवते. माझी बेस्ट फ्रेंड गुजराती असल्यामुळे मला गुजराती तेही एकदम टिपिकल पदार्थ करायला आवडतात. माझ्या मुलीला जे आवडतं तेच माझ्या नवऱ्यालाही आवडतं आणि त्या दोघांनाही कॉन्टिनेन्टल गोष्टी जास्त आवडतात.

त्यामुळे मलाही कोरियन आणि इटालियन पास्ता किंवा कोरियन नूडल्स करायला आवडतं. प्रत्येक पदार्थासाठी जे काही काही मसाले किंवा इतर घटक वापरतो, ते थोड्याफार प्रमाणात सारखेच असतात. म्हणजे आपण उगीच हे नाही, ते नाही अशी तक्रार करतो. ‘माझ्याकडे पास्ता सॉस नव्हता, म्हणून मग कसं करणार?’ वगैरे चर्चा मी ऐकते.

मी शूटिंग वगैरेच्या व्यापातून वेळ काढून, स्वतः घरी त्याचा सॉस तयार करू शकते, तर तुम्हीही तयार करू शकता. मला एक गोष्ट कळली, की अज्वाइन म्हणजे ओवा. चक्क ओव्याची पानं असतात ती आणि आपण विदेशी नावाला गोंधळून उपलब्ध नाही म्हणून पदार्थ करणं सोडून देतो. या गोष्टी कळल्यामुळे परदेशी पदार्थांसाठी एखादा घटक नसेल, तर मी आपल्या मसाल्यांचे पर्याय वापरते. उदाहरणार्थ, लाल तिखट वगैरे.

सर्वांनी आनंद देणारा छंद जोपासला पाहिजे. अनेकदा आपल्या मनातल्या इच्छा, आवडी आपण करिअरच्या नावाखाली दाबून टाकतो. मात्र, अशा आपल्या इच्छांना आपण छंद बनवलं पाहिजे. सगळ्या आवडीनिवडी आपण जोपासल्या पाहिजेत. आजच्या धकाधकीच्या वातावरणात, जीवनात छंद असलाच पाहिजे, म्हणून मला मनापासून वाटतं, की पालकांनी आपल्या मुलांना आवडतं ते करू दिलं पाहिजे.

नंतर पुढे जाऊन त्यांच्या करिअरमध्ये, कामांमध्ये हेच छंद त्यांना आनंद देणारे आणि त्यांच्यासाठी ‘स्ट्रेसबस्टर’ ठरतात. सर्व तरुणांना माझा हाच सल्ला असेल, की अजूनही तुम्ही लहान आहात, तुमचं वय आहे, तुम्ही तरुण आहात; तर तुम्ही लवकरात लवकर कोणतातरी छंद जोपासा, कारण हाच छंद नंतर तुम्हाला खूप मोठा आनंद देऊन जाईल.

(शब्दांकन : प्रज्ञा शिंदे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.