Sanjay Raut : ...तर काँग्रेसने स्वबळावर लढावे
esakal October 10, 2024 12:45 PM

मुंबई - हरियाना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचा आत्मविश्वास दुणावला आहे तर महाविकास आघाडीत मात्र शीतयुद्ध सुरू झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. हरियाना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राऊत यांनी काँग्रेसला उघडपणे आव्हान दिले आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेसला हरियानात असे वाटले की, आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कुणाची गरज नाही.

जिथे काँग्रेसला असे वाटते की, आम्ही मजबूत आहोत तिथे ते स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. कुणीही स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका जाहीर केली पाहिजे. मग इतर पक्ष आपापले निर्णय त्या-त्या राज्यांत घेतील’, असे राऊत यांनी सुनावले.

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘संजय राऊत आणि आम्ही यावर बैठकीमध्ये बसून बोलू. राऊत यांचा संबंधित अग्रलेख वस्तुस्थितीवर होता की, मुद्दाम लिहायचे म्हणून लिहिला होता, ते विचारू. आम्ही समन्वयाने महाराष्ट्रात काम करतोय त्याचा अर्थ चांगलाच लावावा.’

हरियाना व महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढतो, हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे काँग्रेसवर काहीही आरोप केलेले सहन केले जाणार नाहीत.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.