उद्यमशीलतेची 'ट्रंक'
esakal October 10, 2024 12:45 PM

- प्रियांका माणगावकर- वैऊडे / मिनू जोशी, संस्थापक, ‘द टॉय ट्रंक’

गेल्या काही वर्षांत मुलांच्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अविभाज्य भाग बनली आहेत. मात्र लॅपटॉप, मोबाईल या गॅजेट्सचा स्मरणशक्तीवर परिणाम होतो. असे असतानाही युवकांबरोबरच लहान मुलांच्या आयुष्यातही गॅजेट्सचे महत्त्व वाढतच चालले आहे. ऑनलाइन गेम्स इत्यादीमुळे मुलांचे मैदानी खेळ खेळणे कमी झाले आहे.

यामध्ये मुलांच्या सर्वांगीण वाढीचा जो महत्त्वाचा टप्पा असतो त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजले. आणि मुलांच्या वाढीला चालना देणाऱ्या खेळण्यांची बाजारात कमतरता होती असे निदर्शनास आले. यावर संशोधनात्मक काम करत सुरतच्या मिनू जोशी आणि मुंबईच्या प्रियांका माणगावकर यांनी मुलांच्या विकासासाठी उपयुक्त अशी खेळणी ‘द टॉय ट्रंक’ हे ब्रँड बाजारात आणले आहे.

सुरत आणि मुंबई एकत्र

मिनू या मूळच्या अहमदाबादच्या. त्याचे शिक्षण सुरतमध्ये झाले. प्रियांका मुंबई शहरातील. दोघींचे शिक्षण आर्किटेक्चरमध्ये झाले. २०२० मध्ये त्या एक महत्त्वाचा रिसर्च पेपर लिहीत होत्या, ज्यामध्ये त्यांनी भारतातील विविध आर्ट्स आणि क्राफ्ट्सची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक प्रकारच्या हस्तकला आहेत ज्या आपला सांस्कृतिक वारसा जपत आलेल्या आहेत, परंतु काळ बदलत असताना या पारंपरिक कलेचे महत्त्व कमी होत चालले आहे.

आधुनिक गरजांमुळे या कलांवर कमी लक्ष दिले जात आहे, ज्यामुळे त्या हरवत चालल्या आहेत. एक डिझायनर म्हणून त्यांना वाटले, की या पारंपरिक हस्तकला टिकवण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व पुनर्स्थापित करण्यासाठी आपण काहीतरी ठोस योगदान द्यायला हवे. या विचारातूनच ‘द टॉय ट्रंक’ ची संकल्पना उभी राहिली.

सावंतवाडी येथील लाकडी खेळणी बनविणाऱ्या क्लस्टरसोबत त्या काम करत होत्या आणि त्यावेळी एका लाकडी खेळण्यांवर काम करत होत्या. त्या संशोधनात्मक अभ्यासातून व्यावसायाची कल्पना आली. दोघी डिझायनर असल्याने मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त अशी खेळणी बनविण्याचा निश्चय त्यांनी केला आणि ही खेळणी भारतातील विविध खेळणी बनविणाऱ्या क्लस्टरसोबत बनवायचे असे त्यांनी ठरवले. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी लाकडी खेळणी या संकल्पनेवर त्यांनी काम केले. त्यानंतर या विषयांवर बाजाराविषयी संशोधनात्मक अभ्यास केला आणि या प्रॉडक्टची निर्मिती केली.

काय आहे ‘द टॉय ट्रंक’?

‘द टॉय ट्रंक’ हा ब्रँड मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाला चालना देणाऱ्या, पर्यावरणपूरक आणि शाश्वत खेळण्यांची निर्मिती करतो. या खेळण्यांमुळे मुलांमध्ये एकाग्रता वाढते, हात-डोळा समन्वय सुधारतो आणि मुलांना अनुभवातून शिकण्यास मदत मिळते. ही खेळणी त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन त्यांची संपूर्ण वाढ सुनिश्चित करतात.

कशी सुचली कल्पना?

मुलांसाठी प्रारंभिक बालपण विकास हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात मूल शारीरिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या विकसित होत असते. बालपणाचा विकासावर प्रियांका, मिनू गेली काही वर्ष काम करीत होत्या. या अभ्यासादरम्यान असे लक्षात आले, की मुलासाठी जी खेळणी आहेत ती त्याच्या विकासावर परिणाम करू शकतात. त्यातून अभ्यास वाढत गेला आणि ‘टॉय ट्रंक’द्वारे त्याला मूर्त स्वरूप आले.

‘द टॉय ट्रंक’ची वैशिष्ट्ये -

  • मुलांचा स्क्रीनटाइम कमी करणे

  • पर्यावरणपूरक खेळणी

  • शारीरिक आणि मानसिक क्षमता यांचा विकास

  • हस्तकलेची जपणूक

महिलांनी कल्पनाशक्तीवर ठाम राहावे!

पॅशन, प्रिन्सिपल आणि आपल्या व्यवसायाच्या कल्पनेवर विश्वास असणे महत्वाचे आहे. तुम्ही जेव्हा ठरवता की, मला हे करायचे आहे त्यावर ठाम राहून आपल्या कामांवर विश्वास ठेवून मेहनत केली पाहिजे. तुम्ही कोणत्याही वयात व्यवसाय करण्याचा निर्णय घेवू शकता. ‘एज एज जस्ट अ नंबर’ हा या दोघी मैत्रिणींचा बिझनेस मंत्रा आहे असे त्या सांगतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.