बापच झाला वैरी? 6 वर्षाच्या आजारी मुलाला मारहाण केली, छताला उलटे टांगले, चांदवडमध्ये धक्कादायक प्रकार
Shital Mandal October 10, 2024 06:55 PM

प्रत्येक मुलगा हा आपल्या वडिलांना सुपरमॅन समजतो. आपले वडील हेच आपले सर्वस्व आहेत, असं मुलाला वाटतं. अर्थात बाप आणि मुलाचं नातच तसं असतं. मुलगा आजारी पडला तर त्याचे वडील अक्षरश: कासावीस होतात. आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले तर वडील तिला समजवतात. आपल्या मुलाला काही होणार नाही, असं आश्वस्त करतात. वडील मुलगा आणि पत्नीला आधार देत असतो. तो घराचा आधारवड असतो. पण काही ठिकाणी अपवादात्मक प्रकार बघायला मिळतात. वडिलांना आपल्या पोटच्या मुलाची काळजी वाटत नाही. अशावेळी बाप-मुलाच्या नात्यालाच जणू काळीमा फासली जाते. नाशिकच्या चांदवडमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पित्याने आपल्या 6 वर्षांच्या पोटच्या मुलाला तो आजारी असताना त्याला मारहाण केली. निष्ठूर पिता तेवढ्यावर थांबला नाही तर त्याने मारहाण करत मुलाला छताला उलटं टांगलं. चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याने तब्येत ठीक नसल्याने मुलाला औषध उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र तिथे जास्त पैसे खर्च झाले या कारणावरून मंगेश नंदू बेंडकुळे याने पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलाला मारहाण केली. याचवेळी आरोपीने मुलाला दोरीने बांधून छताला उलटे लटकवत मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

आजारी असलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याला छताला उलटे टांगत मारहाण केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे घडली आहे. या घटनेविरोधात सहा वर्षांच्या चिमुकल्याच्या आईच्या फिर्यादीवरून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

आजारी असलेल्या या सहा वर्षाच्या चिमुकल्याला दवाखान्यात नेत औषध उपचारासाठी जास्त खर्च येत असल्याच्या रागापोटी सहा वर्षाच्या चिमुकल्याला छाताला उलटे टांगले. यावेळी पती मंगेश नंदू बेंडकुळे याला पत्नीने विरोध केला असतात दोघात भांडण झाल्याने चिमुकल्याला आणि पत्नीला मंगेशने मारहाण केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.