Aaj Che Havaman (आजचे हवामान): कोकण, मध्य महाराष्ट्राला आज मुसळधार पावसाचा फटका! IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Times Now Marathi October 11, 2024 06:45 PM

Maharashtra IMD Weather Update Today: ऑक्टोबर हीटचा चटका सहन केल्यानंतर राज्यातील काही भागाला आता पारतीच्या पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची हजेरी लागत आहे. अशात आज म्हणजे 11 सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागानुसार, अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते उत्तरेकडे सरकून कर्नाटक आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत सक्रिय आहे. वायव्येकडे या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. ही स्थिती काही भागातील परतीच्या पावसाला अनुकूल आहे.

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
परतीच्या पावसाने उसंत घेल्याने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल होत परतीच्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने वातावरणात काहीसा गारवा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळ-वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागासाठी हवामान विभागातर्फे पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

'या' ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
तर मुंबई, पालघर, ठाणे, जळगाव, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात आज हलका ते मध्याम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

विदर्भात दोन दिवस पावसाचे
दरम्यान, विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांना आज व उद्या असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.