WTC Point Table : पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत करताच गुणतालिकेत उलथापालथ, या संघाला बसला फटका
GH News October 18, 2024 06:15 PM

पाकिस्तान संघाला अखेर कसोटी सामन्यात विजयाचं तोंड पाहण्याचा योग जुळून आला. गेल्या काही दिवसांपासून कसोटीत वारंवार पराभव होत असल्याने टीकेची झोड उठली होती. इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर संघात बरीच उलथापालथ झाली. दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या कसोटी पाकिस्तान संघ जिंकणार की नाही अशी स्थिती होती. पण पाकिस्तानने नवख्या खेळाडूंसह दिग्गज इंग्लंड संघाला पराभवाचं पाणी पाजलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 10 गडी गमवून 366 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 10 गडी गमवून 291 धावा केल्या. यामुळे पाकिस्तानकडे पहिल्या डावात 75 धावांची आघाडी होती. यासह पुढे खेळताना पाकिस्तानने 10 गडी गमवून 221 धावा केल्या आणि 75 धावांची आघाडी मिळून 296 धावा विजयासाठी दिल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 144 धावांवर बाद झाला. पाकिस्तानने या सामन्यात 152 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर होता. पाकिस्तानची विजयी टक्केवारी 16.670 इतकी होती. आता विजयानंतर ही टक्केवारी 25.92 इतकी झाली आहे. त्यामुळे गुणतालिकेत एका स्थानाचा फायदा झाला आहे. वेस्ट इंडिजला मागे टाकत पाकिस्तानने आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजचा संघ 18.52 विजयी टक्केवारीसह नवव्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंड संघालाही या पराभवाचा फटका बसला आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी 45.59 टक्के होती ती आता घसरून 43.05 टक्क्यांवर आली आहे. असं असलं तरी इंग्लंडचं चौथं स्थान अबाधित आहे.

दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलिया अजूनही पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. भारताची विजयी टक्केवारी ही 74.24 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62.50 इतकी असून दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होऊ शकते. पहिल्या कसोटी टीम इंडिया पराभवाच्या सावलीखाली उभी आहे. त्यामुळे नंबर एक स्थानाला काही फटका बसणार नाही. पण विजयी टक्केवारी मात्र घसरेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.