राजनच्या भूमिकेत बिश्नोई!
esakal October 19, 2024 12:45 PM

- जयेश शिरसाट, jayesh.shirsat@esakal.com

बिश्नोईने साबरमती कारागृहात बसून एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी गोळीबार घडवला. या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी बिश्नोईचा ताबा घेण्याची परवानगी गृह मंत्रालयाने अद्याप मुंबई गुन्हे शाखेला दिलेली नाही. इतकेच नव्हे तर गुन्हे शाखेला साबरमती कारागृहात जाऊन बिश्नोईची चौकशी करणेही शक्य झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय माफियांना नियंत्रणात ठेवणे, देशविघातक कृतीस मिळणारे पाठबळ थोपवणे, शत्रू राष्ट्रांच्या भारतात स्थिरावलेल्या एजंटांच्या बंदोबस्तासोबत गोपनीय माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर संघटनांना कायम राजनसारख्या गुन्हेगारांची निकड भासत आली; मात्र गुप्तहेर संघटनांच्या वरदहस्ताने हे गुन्हेगार बेलगाम झाले. वर्चस्वाच्या वादातून त्यांनी बेसुमार रक्तपात घडवला. खंडणीसाठी उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील वलयांकित व्यक्तींना वेठीस धरण्यास सुरुवात केली. राजनची अटक, वाढते वय आणि निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी बिश्नोईच्या रूपाने भरून काढली जाते का, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कुख्यात लॉरेन्स बिश्नोई ‘टोळी’चा सहभाग स्पष्ट करणारे धागेदोरे मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागले. त्याच सुमारास कॅनडाने पत्रकार परिषद घेत बिश्नोईचा उल्लेख भारत सरकारचा ‘एजंट’ असा केला. बिश्नोई टोळीने कॅनेडियन भूमीवर आरंभलेले रक्तरंजित गुन्हे भारतपुरस्कृत आहेत. किंबहुना असे गुन्हे करण्यासाठीच भारत सरकारने हेतुपुरस्सर या टोळीला कॅनडात घुसवले.

या संपूर्ण प्रक्रियेत तेथील भारताचे राजनैतिक अधिकारीही सहभागी आहेत, असा गंभीर आरोप केला. नुसता आरोप करून हा देश थांबलेला नाही. तर, हे आरोप निर्विवाद स्पष्ट करणारे भक्कम पुरावेदेखील आपल्याकडे आहेत, असा दावा कॅनडाने केला आहे. या घडामोडींबाबत वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार १२ ऑक्टोबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या उभय देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत कॅनडाचा दावा भारताने फेटाळून लावला. त्यावर हे पुरावे न्यायालयात मांडून जगासमोर भारताचा खरा चेहरा आणू, असा इशारा कॅनडाने दिला.

कॅनडाचे आरोप खरे मानण्याआधी गुजरातेत साबरमती कारागृहात बंद असलेल्या बिश्नोईचे अलीकडच्या काळातील गुन्हे आणि त्यावर केंद्र सरकारची भूमिका तपासावी लागेल. गेल्या वर्षी १८ जून रोजी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. १९९०मध्ये कॅनडात स्थायिक झालेल्या निज्जरकडे शीख समुदाय मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून पाहत होता. तर, भारत सरकारसाठी तो खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य होता.

निज्जरपाठोपाठ सुखडोलसिंग गील याला ठार करण्यात आले. पंजाब, हरयानात गंभीर गुन्ह्यांची मालिका घडवून २०१७च्या सुमारास कॅनडात पसार झालेला गील याचेही फुटीरतावाद्यांशी संबंध होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) त्याचे नाव फरार गुन्हेगारांच्या सूचीत जोडले आणि दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्यांमागे बिश्नोई, भारतीय एजंट, भारतीय राजनैतिक अधिकारी आणि खुद्द भारत सरकार आहे, असा आरोप कॅनडाने केला आहे.

तत्पूर्वी २०२२ मध्ये प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणी बिश्नोईला अटक करण्यात आली. बिश्नोईचा साथीदार गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अकाली दल युवा नेता विक्की मुद्दुखेरा याच्या हत्येचा बदला घेतल्याचे ब्रार याने जाहीर केले. याप्रकरणी बिश्नोईला तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुजरात एटीएसने सुमारे २०० कोटींच्या अमली पदार्थ तस्करीप्रकरणी बिश्नोईचा ताबा घेतला आणि त्याला साबरमती कारागृहातील संरक्षित कोठडीत आणून ठेवले.

याच महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने फौजदारी दंड संहितेतील कलम २६८ चा आधार घेत देशातील कोणतीही तपास यंत्रणा कोणत्याही कारणासाठी साबरमती कारागृहातून बिश्नोईचा ताबा घेऊ शकणार नाही, असे आदेश जारी केले. याचाच अर्थ फक्त गृह मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या बिश्नोईने साबरमती कारागृहात बसून एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी गोळीबार घडवला. या गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी बिश्नोईचा ताबा घेण्याची परवानगी गृह मंत्रालयाने अद्याप मुंबई गुन्हे शाखेला दिलेली नाही. इतकेच नव्हे तर गुन्हे शाखेला साबरमती कारागृहात जाऊन बिश्नोईची चौकशी करणेही शक्य झालेले नाही. या पार्श्वभूमीवर कॅनडाचे आरोप खरे की खोटे, हे जोखणे कठीण नाही.

कधी काळी राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन आणि काही अंशी रवी पुजारी, दाऊदही या भूमिकेत होते. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी देशाची सुरक्षा हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत या ना त्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांची मदत घेतली आहे. १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींचे हत्यासत्र, नेपाळचे खासदार मिर्झा दिलशाद बेग हत्याकांड, बँकॉक येथील जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेल्या राजनचे रुग्णालयातून चमत्कारिक पलायन, त्यानंतरचे टोळीयुद्ध या व अशा, देश-परदेशात घडलेल्या घडामोडींमध्ये कमी-अधिक प्रमाणात गुप्तहेर संघटनांचा सहभाग आढळतो.

१९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर दाऊदपासून फुटलेल्या राजनला रॉ, आयबीने जवळ केल्याच्या अनेक कहाण्या आहेत; मात्र २००५ मध्ये राजन टोळीचे गँगस्टर विकी मल्होत्रा आणि फरीद तनाशा यांना मुंबई पोलिसांनी दिल्लीत केलेली अटक या कहाण्यांवर शिक्कामोर्तब ठरते. आयबीच्या निवृत्त महासंचालकाच्या गाडीतून त्यांना मुंबई पोलिसांनी पकडले. पडद्याआडून राजन टोळीमार्फत दाऊदचा खात्मा किंवा त्याला भारतात आणण्याचे ते ऑपरेशन होते. त्यासाठी विकी, फरीदला प्रशिक्षित करण्यात आले होते. या घटनेवर आधारित ‘डी-डे’ हा चित्रपट गाजला.

बनावट नोटा, अमली पदार्थ किंवा शस्त्र तस्करीत सक्रिय आंतरराष्ट्रीय माफियांना नियंत्रणात ठेवणे, देशविघातक कृतीस मिळणारे पाठबळ थोपवणे, शत्रू राष्ट्रांच्या भारतात स्थिरावलेल्या एजंटांच्या बंदोबस्तासोबत गोपनीय माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेर संघटनांना कायम राजनसारख्या गुन्हेगारांची निकड भासत आली; मात्र गुप्तहेर संघटनांच्या वरदहस्ताने हे गुन्हेगार बेलगाम झाले. वर्चस्वाच्या वादातून त्यांनी बेसुमार रक्तपात घडवला. खंडणीसाठी उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील वलयांकित व्यक्तींना वेठीस धरण्यास सुरुवात केली. याशिवाय वैयक्तिक फायद्यासाठी, उट्टे काढण्यासाठी गुप्तहेर संघटना, पोलिस यंत्रणेने वरदहस्तप्राप्त संघटित टोळ्यांचा वापर सुरू केला.

राजनची अटक, वाढते वय आणि निष्क्रियतेमुळे निर्माण झालेली पोकळी बिश्नोईच्या रूपाने भरून निघाल्याचे चित्र वरील घटना दर्शवितात. अद्याप सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे प्रत्यक्ष बिश्नोईपर्यंत पोहोचलेले नाहीत; मात्र गेल्या पाच दिवसांत या हत्येच्या निमित्ताने मिळालेली प्रसिद्धी आणि निर्माण झालेली दहशत बिश्र्नोईला छोटा राजनप्रमाणे ‘देशभक्त’ (?) आणि ‘हिंदू डॉन’ म्हणून प्रस्थापित करू शकते, तसा स्पष्ट संदेश ठरावीक वर्गापर्यंत पोहोच होऊ शकतो.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेचच समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या. सिद्दीकी आणि त्यांचे आमदार पुत्र झिशान वांद्रे येथील दोन मोक्याच्या आणि हजारो कोटी रुपयांचा नफा कमावून देणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प थोपवू पाहत होते.

यातील एका झोपडपट्टीत एसआरएने सुरू केलेले सर्वेक्षण झिशान यांनी उधळून लावले. त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही नोंद झाला होता. हा संघर्ष सिद्दीकी यांच्या हत्येचे निमित्त ठरला का, हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर हे प्रकल्प सुरू होतात का, याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष आहे. बिश्नोई टोळीच्या मदतीने भविष्यात म्हातारा दाऊद, समवयस्क टायगर मेमन, छोटा शकील भारतात आणले गेले तर ती कदाचित कौतुकाची बाब ठरू शकेल; पण राजकीय हेतूने प्रेरित गुन्हे घडल्यास, दहशत निर्माण झाल्यास त्याचे देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.