Ajit Pawar: "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू"; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
esakal October 19, 2024 07:45 PM

नाशिकमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा "लाडकी बहीण योजना" होती. या योजनेवर विरोधकांनी केलेल्या आक्षेपानंतर अजित पवारांनी या योजनेबद्दल स्पष्टपणे मांडणी केली.

यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेतून अनेक महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ही योजना थांबवण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, "तुमच्या काळात कधीच अशी योजना आली नाही, आता आमच्या योजनेवर का पोटदुखी होतेय?" अजित पवारांनी विरोधकांना स्पष्ट शब्दांत विचारले की, ही योजना तुमच्या घरची आहे का, की ते बंद करण्याची चर्चा करत आहात?

पवारांनी आश्वासन दिले की, राज्याच्या आर्थिक स्थितीची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि त्यासाठी ते केंद्रातून आवश्यक निधी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे, आणि त्यांनी विरोधकांवर आरोप करत म्हटले की, महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "मी अर्थमंत्री आहे, मला राज्याची स्थिती माहीत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांचे आरोप आणि त्यांचे प्रत्युत्तर-

अजित पवारांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, विरोधकांकडून राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. "सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नका," असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, विरोधकांच्या सत्तेत आल्यास लाडकी बहिण योजना बंद पडेल, परंतु महायुती सरकार ही योजना चालू ठेवण्यास वचनबद्ध आहे.

आमदारांना विकासासाठी निधी मिळणार-

अजित पवारांनी विकासकामांबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, "महायुतीचे आमदार निवडून आल्यास नाशिक जिल्ह्याला विकासासाठी मोठा निधी दिला जाईल." अल्पसंख्याक मंडळासाठी त्यांनी 30 कोटींचा निधी 500 कोटींवर नेल्याचे देखील सांगितले.

लोकसभा निवडणुकीची तयारी

अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली. "महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत," असे त्यांनी सांगितले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, "महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊन राज्याचा विकास पुढे न्यावा."

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.