Dhule Heavy Rain : परतीच्या पावसाचा धुळ्याला दणका; शहरातील सर्वच भागात बत्ती गुल
esakal October 19, 2024 07:45 PM

धुळे : ऑक्टोबर महिना अर्धा उलटल्यावरही मोसमी पाऊस माघारी फिरायला राजी नसल्याची स्थिती आहे. परतीच्या पावसाने शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी शहरासह परिसराला जोरदार तडाखा दिला. मुसळधारेमुळे नागरिकांसह अनेक भागातील रहिवाशांची धांदल उडाली. सायंकाळी अनपेक्षित झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच भागातील बत्ती रात्री उशिरापर्यंत गुल होती. (Due to heavy rain lights in almost all parts of city were black till late night )

शहरातील चितोड रोडवरील मिलच्या भिंतीलगत रात्री झाड उन्मळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली. दरम्यान, २१ ऑक्टोबरपर्यंत पुन्हा पाऊस होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे.

उकाडा वाढला

शहरातून वाहणारी पांझरा नदी दोन ते अडीच महिन्यांपासून दुथडी भरून वाहत आहे. काही दिवसांपासून शहरात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच कमाल तापमानाचा पारा ३३ अंशांवर स्थिरावला आहे. ऑक्टोबर अर्धा उलटला तरी पाऊस हजेरी लावतच आहे. एक आठवड्यापासून आर्द्रता ९२ टक्के नोंदवण्यात येत आहे. जूनमध्ये सुरवात झालेल्या पावसाचा सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यंदा ऑक्टोबर अर्धा उलटल्यावरही अधूनमधून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याची स्थिती आहे.

शहराला झोडपले

परतीच्या पावसाने शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी शहराला झोडपून काढले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. नाल्या किनारी तसेच पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी गुडघाभर पाणी साचल्याचा अनुभव घेतला. शुक्रवारी दुपारनंतर पावसाने जोर धरला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुसळधारेने हजेरी लावली. टपोरे थेंब आणि जोरदार मारा यामुळे या पावसाने नागरिकांची धांदल उडविली. ()

त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. पावसाचा हंगाम आता संपण्याच्या तयारी आहे. मात्र, आर्द्रता वाढत असल्याने शहरासह जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवेचा दाब कमी होत असल्याने ही स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांचे म्हणणे आहे.

चार वर्षांत सर्वाधिक पाऊस

शहरासह जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात चांगला जलसाठा झाला. यंदा ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात १७ दिवसांत तब्बल ३०५ टक्के पाऊस झाला. गेल्या चार वर्षांत ऑक्टोबरमध्ये इतका पाऊस कधीही झाला नव्हता. शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस झाला.

गेल्या वर्षी पाऊस झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव कोरडा पडला होता. तसेच अक्कलपाडा प्रकल्पानेही तळ गाठला होता. शहरासह जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून चांगला पाऊस होण्यास सुरवात झाली. त्यामुळे बहुतांश प्रकल्प भरले. त्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे, डेडरगाव तलावासह अक्कलपाडा धरणाचा समावेश आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.