IND vs NZ 1st Test : Sarfaraz Khan, ऋषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; टीम इंडियाने गटांगळ्या खाल्ल्या; ५४ धावांत ७ विकेट्स पडल्या
esakal October 20, 2024 02:45 AM

IND vs NZ 1st Test :सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी भारत-न्यूझीलंड कसोटीचा चौथा दिवस गाजवला, पण नव्या चेंडूसह न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पुन्हा घाम फोडला. विलियम ओरोर्कने अचूक मारा करताना टीम इंडियाला बॅकफूटवर फेकले. संघाच्या ४०८ धावा असताना सर्फराज बाद झाला आणि त्यानंतर पुढील ५४ धावांत भारताचे ७ फलंदाज तंबूत परतले.

पहिल्या डावात ४६ धावांवर संपूर्ण संघ माघारी परतल्यानंतर भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यात न्यूझीलंडने ४०२ धावांचा डोंगर उभारून घेतलेली ३५६ धावांची आघाडी टेंशन वाढवणारी होती. पण, फलंदाजीसाठी पोषक झालेल्या खेळपट्टीवर भारताने जबरदस्त पुनरागमन केले. Sarfaraz Khan-Rishabh Pant या जोडीने न्यूझीलंडला हादरवून टाकले आणि भारताला आघाडी मिळवून दिली. यशस्वी जैस्वाल ( ३५), रोहित शर्मा ( ५२) ,विराट कोहली ( ७०) यांनी साजेशी सुरुवात करून दिली होती. विराट व सर्फराज खान यांनी तिसरा दिवस गाजवला आणि १३६ धावांची भागीदारी केली. दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर विराटची विकेट पडल्याने चाहते निराश झाले. पण, सर्फराज व ऋषभ पंत या जोडीने चौथ्या दिवशी पैसा वसूल फटकेबाजी केली. या दोघांनी २११ चेंडूंत १७७ धावा कुटल्या.

सर्फराज १९५ चेंडूंत १८ चौकार व ३ षटकारांसह १५० धावांवर झेलबाद झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर उपस्थित प्रत्येकाने सर्फराजसाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्याने भारतीय संघाला सकारात्मक मार्गावर आणले. आता ऋषभच्या शतकाही सर्वांना ओढ लागली होती, परंतु नशीब पुन्हा त्याच्या आडवे आले. विलियम ओरोकेने टाकलेला चेंडू ऋषभच्या बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला. ऋषभ १०५ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ९९ धावांवर बाद झाला. लोकेश राहुल ( १२) मिळालेल्या संधीवर पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला ४३८ धावांवर सहावा धक्का बसला.

रवींद्र जडेजा ( ५) अपयशी ठरला, परंतु आर अश्विनने काही सुरेख फटके मारून आशा पल्लवीत केल्या होत्या. तेव्हा किवींनी गोलंदाजीत बदल करताना मॅट हेन्रीला आणले आणि त्याने अश्विनला ( १५) पायचीत पकडले. अम्पायर कॉलमुळे आर अश्विन बाद ठरला. पाठोपाठ हेन्रीने भोपळ्यावर जसप्रीत बुमरहाला बाद केले. मोहम्मद सिराजही शून्यावर बाद झाल्याने भारताचा दुसरा डाव ४६२ धावांवर गडगडला आणि न्यूझीलंडसमोर १०७ धावांचे आव्हानच भारताला ठेवता आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.