घोळात घोळ याद्यांचा घोळ…!
esakal October 21, 2024 11:45 AM
ढिंग टांग

प्रिय नानाभाऊ पटोलेजी यांस, काही तरी गडबड झाली आहे. माझ्याकडे आपल्या पक्षातील संभाव्य उमेदवारांची फायनल यादी आली आहे. ती दिल्लीला पाठवायची आहे. परंतु, मला संशय येत आहे की ही यादी आपल्या पक्षाची नसून उबाठाच्या उमेदवारांची आहे. नेमका प्रकार कळत नाही. तुम्ही अध्यक्ष या नात्याने लक्ष घाला, मग मी ती यादी दिल्लीला वंदनीय महामॅडमजी आणि प्रार्थनीय राहुलजींकडे घेऊन जाईन. (तेव्हा तुम्ही नाही आलात तरी चालेल!) मुद्दा हा आहे की उबाठाची यादी आपल्याकडे आली, मग आपली यादी कुठे गेली? तातडीने तपास करावा ही विनंती. आपला (म्हंजे पक्षाचा!) एकनिष्ठ कार्यकर्ता. पृथ्वीराजबाबाजी चव्हाण.

ता. क. : असेच पत्र माहितीसाठी श्री. बाळासाहेब (थोरात) यांनाही पाठवले आहे.

प्रिय बाबाजीसाहेब, फायनल यादी अजून माझ्याकडेच आहे, कारण ती फायनल झाली की मी स्वत:च ती दिल्लीला घेऊन जाणार आहे. (तेव्हा तुम्ही कोणीही आला नाहीत तर बरे!!) तुमच्याकडे आलेली यादी उबाठाची असेल तर तीही ताबडतोब पक्ष कार्यालयात आणून द्यावी. मी तीदेखील दिल्लीला घेऊन जातो. काल मीटिंगमध्ये उबाठाच्या संजयाजी राऊत यांच्याशी थोडी झकाझकी झाली, तेव्हा त्यांच्या खिश्यातून ती यादी खाली पडली असणार, आणि तीच तुम्हाला मिळाली असणार!! खाली पडलेला कागद कशाला उचललात? असो. कळावे, आपला अध्यक्ष. नानाभाऊ पटोले. (हात नहीं हतोडा!!)

ता. क. : माझाही यादीचा कागद कुठेतरी पडला!! लागली वाट!!

प्रिय जयंतरावजी, जय महाराष्ट्र. काहीतरी गडबड होऊन तुमच्या घड्याळवाल्या पक्षाच्या उमेदवारांची नावे असलेला एक कागद चुकून माझ्या खिश्यात आला आहे. कसा आला, काही सांगता येत नाही. शिवाय आमची उमेदवारांची यादीही कुठेतरी गहाळ झाल्यासारखी वाटते आहे.

तुमच्या पक्षाच्या ‘उमेदवारांची यादी’ असे लिहिलेल्या कागदावर ‘श्रीमती महामॅडमजी आणि राहुलजी यांच्या विचारार्थ’ असे नमूद केले आहे, पण खाली काही नावेच दिसत नाहीत. एक घड्याळही काढलेले दिसले! (त्यात बारा वाजलेले दाखवले आहेत!) काल मीटिंगमध्ये आपल्यात जी वैचारिक आणि पांडित्यपूर्ण चर्चा झाली, त्या चर्चेत संतापाच्या भरात मीच तो यादीचा कागद गिळला, असा संशय आमच्याच पक्षातील काही लोकांना येत आहे. पण मी आत्ताच एक्सरे फोटो काढून आलो. (फ्रंट आणि बॅक) पण काहीही आढळून आलेले नाही. मीटिंगमध्ये खाल्लेले बटाटेवडे तेवढे दिसले आहेत. पण ते एक असो.

याद्यांची अशी अदलाबदल बरी नव्हे. त्यामुळे आपसांत उगाचच भांडणे होतात. लौकरात लौकर काय तो तुमचाही एक्सरे, एमाराय काढा, आणि जागावाटप जाहीर करा. कळावे. आपला. संजयाजी राऊत (मु. पो. भांडुप)

आदरणीय संजयाजीसाहेब, भलताच घोळ होऊन बसला आहे. आपल्या याद्या चुकून एकमेकांकडे गेल्या आहेत. तुम्हाला जी आमच्या पक्षाची यादी आली आहे, ती आमची नाहीच. (नानाभाऊंनी बसल्या बसल्या कागदावर घड्याळाचे चित्र काढले. नुसते काढले नाही, तर त्यात बाराही वाजवले!! काय बोलायचे?) तुमच्या पक्षाची यादी नानाभाऊंकडे गेली आहे असे त्यांनी पृथ्वीबाबाजी चव्हाणसाहेबांना कळवले आहे. आता सापडलेल्या याद्या घेऊन हे काँग्रेसवाले दिल्लीला हायकमांडकडे जाणार!! वाटाघाटींना नव्याने सुरवात करावी लागणार!! कधी एकदा जागावाटप संपते आहे, असे झाले आहे.

आपापल्या याद्या सांभाळा, हेच सांगायचे आहे. बाकी एकजूट वगैरे काय म्हणतात, ती आपल्यात आहेच!! कळावे. आपला. जयंतरावजी पाटीलसाहेब (महाराष्ट्राचे भविष्य-असं साहेब म्हणाले!!!)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.