'यूएलआय' क्रांतिकारी कर्जसुविधा
esakal October 21, 2024 11:45 AM
संजय देशपांडे निवृत्त वरिष्ठ बँक अधिकारी

सध्याचे जग हे डिजिटल आहे. आर्थिक क्षेत्रातही डिजिटल सेवांनी प्रवेश करून क्रांतिकारी सुधारणा घडवून आणली आहे. आता रोख पैसे न बाळगता मोबाइलच्या एका क्लिकवर पैशाची देवाण-घेवाण करणे शक्य झाले आहे. अगदी किरकोळ रकमेपासून ते हजारो रुपयांपर्यंतचे व्यवहार युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’द्वारे अगदी काही मिनिटांत करणे शक्य झाले आहे. दररोज लाखो व्यवहार सुरळीत पार पडत आहेत. ‘यूपीआय’ अधिक सुलभ, सुरक्षित आणि विस्तारित होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि रिझर्व्ह बँक काटेकोरपणे आपली भूमिका बजावत आहेत.

याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे ‘युनिफाइड लेडिंग इंटरफेस’ (यूएलआय) सुविधा. सहजसुलभ पद्धतीने कर्जवितरण करण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे कर्जसुविधा अधिक लोकाभिमुख, कागदविरहित, जलद आणि सुरक्षित होणार आहे. यामध्ये कर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीची माहिती, भूमी अभिलेखाची माहिती, इतर बिगरवित्तीय, वित्तीय माहिती, प्राप्तिकरविषयक माहिती आणि ‘ई-केवायसी’ करून त्वरित कर्ज मंजूर केले जाणार आहे. त्यामुळे ‘यूएलआय’ कर्जमंजुरी, वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडविण्याची अपेक्षा आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी २६ ऑगस्ट रोजी बंगळूर येथे झालेल्या ‘आरबीआय @९०’ या जागतिक परिषदेतील ‘जनतेसाठी डिजिटल पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर बोलताना युनिफाइड लेडिंग इंटरफेस’चे पथदर्शी प्रकल्प मागील वर्षात सुरू केल्याचे सांगितले. ‘रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब’द्वारे (RBIH ) या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात किसान क्रेडिट कार्ड लाभार्थी, तारणाविरहित ‘एमएसएमई’ आणि वैयक्तिक स्तरावर कर्जदारांना सहभागी बँकांच्या माध्यमातून ‘यूएलआय’द्वारे कर्ज दिले जाणार आहे.

‘यूएलआय’चे फायदे

  • ‘यूएलआय’द्वारे ग्राहकांची वित्तीय, बिगरवित्तीय माहिती, वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांकडून जमा करून वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका यांना तत्परतेने, विनासायास उपलब्ध केली जाईल. त्यामुळे कर्जमंजुरी व वितरण जलदगतीने होईल.

  • कर्जमंजुरी, कर्ज करार प्रक्रिया पारदर्शक होईल.

  • कर्जदार व्यक्तींचा सर्व तपशील, डिजिटल ॲपद्वारे कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था, बँका नियंत्रित करू शकतील; यामुळे गैरप्रकाराला आपोआपच आळा बसेल.

  • कर्जपुरवठादार संस्था, बँका आपले कर्जविषयक निर्णय अधिक उत्तम पद्धतीने घेऊ शकतील.

  • डिजिटल ॲपद्वारे ग्राहकांचा वेळ आणि पैसाही वाचेल.

  • लघु उद्योजक, ग्रामीण क्षेत्रातील कर्जदार यांना जलद गतीने कर्ज उपलब्ध होईल.

  • कर्ज देणाऱ्या विविध बनावट ॲपनाही आळा बसेल, लोकांची आर्थिक फसवणूक टळेल.

  • ‘यूएलआय’चे धोके

  • ग्राहकांनी कर्ज घेण्याआधी विविध बँकांचे व्याजदर, नियम, अटी-शर्ती याची बारकाईने तपासणी करणे जरुरी आहे; अन्यथा काही वित्तीय संस्थांकडून अल्प मुदतीच्या कर्जासाठीही उच्च व्याजदर, सेवाशुल्क आकारण्याचा धोका उद्भवू शकतो.

  • ग्राहक तंत्रस्नेही असणे गरजेचे आहे; अन्यथा ॲप वापरताना अडचणी येऊ शकतील.

  • ‘यूएलआय’ ॲपमुळे असंख्य कर्जदारांना अगदी सहज कर्ज घेता येईल. पारदर्शक आणि सुलभ प्रक्रियेमुळे त्यांना समाधान मिळेल. त्यांच्या अमूल्य वेळेची, श्रमाची बचत होईल आणि देशाच्या विकासासाठी हातभार लागेल, यात शंका नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.