अस्थिरतेशी प्रभावी सामना : बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड
esakal October 21, 2024 11:45 AM
संतोष केदारी संचालक, सॅनरिया फिनवेस्ट प्रा. लि.

अस्थिरता, भीती आणि लोभ यामुळे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त फायदा घेण्यापासून वंचित राहतात. एका बाजूला, अस्थिरता सामान्यतः मालमत्तावर्गाचा नकारात्मक पैलू म्हणून पाहिली जाते, जी गुंतवणूकदारांना दूर ठेवते; आणि दुसरीकडे, भीती आणि लोभ यांचा सामना करण्यातील असमर्थता संपत्ती निर्मितीच्या वाटचालीत अडथळा आणते. खरेतर, अस्थिरतेतही संधी असते, तिचा योग्य वापर केल्यास मोठी संपत्तीनिर्मिती होऊ शकते.

भीती आणि लोभ यांसारख्या भावनिक पूर्वग्रहांना नियंत्रणात ठेवणे यशस्वी गुंतवणुकीचा अनुभव देऊ शकते. मात्र, कोणालाही अस्थिरता आवडत नाही आणि बहुतेक गुंतवणूकदारांना बाजार पडत असताना भीती न बाळगणे आणि बाजार तेजीत आल्यावर मोहात न पडणे कठीण जाते. त्यामुळे संपत्तीनिर्मिती दूर राहते. अशा स्थितीत बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड योग्य पर्याय ठरतो.

बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड अस्थिरतेचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा फंडांमध्ये सतत घसरणीत खरेदी करा आणि तेजीत उच्च पातळीवर विक्री करा, असे धोरण असते. त्यामुळे अस्थिरतेदरम्यान उपलब्ध झालेल्या संधींचा हा फंड योग्य लाभ घेऊ शकतो आणि सर्वोत्तम परतावा देऊ शकतो. याव्यतिरिक्त, हे धोरण शेअर बाजार उच्चांकी असताना शेअरमधून कर्जरोख्यांमध्ये (डेट) मालमत्ता पुनर्वाटप करून भीती आणि लोभ या गुंतवणुकीशी संबंधित भावनिक पूर्वग्रहांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करते.

बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड प्रामुख्याने कर्जरोखे (डेट) आणि समभाग (शेअर)या मालमत्तावर्गांमध्ये गुंतवणूक करतात. बाजाराच्या परिस्थितीनुसार, ते यातील गुंतवणुकीचे पुनर्वाटप यंत्रणेसह मूल्यांकन करून भांडवल निर्माण करण्यासाठी सुसज्ज आहेत. अशा योजना कोणत्याही मालमत्तेतील गुंतवणूक ८० टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात आणि २० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतात. हे दीर्घकालीन स्थिरतेसह सर्वोत्तम परतावा निर्माण करण्यात मदत करते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड

गुंतवणूकदारांना या श्रेणीत एक चांगला पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड. या फंडाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज आणि डायनॅमिक अॅसेट अलोकेशन श्रेणीतील हा सर्वांत मोठा आणि प्रमुख फंडांपैकी एक आहे. या फंडाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत २३.५९ टक्क्यांचा एक वर्षाचा परतावा दिला. तीन वर्षांचा १३.७५ टक्के आणि पाच वर्षांचा १४.३७ टक्के आहे. त्यामुळे गुंतवणुकीचे संतु लन साधण्यासाठीदेखील बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड एक उत्तम पर्याय आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.