माजी प्रियकराने मुलीला पेटवले
Marathi October 21, 2024 05:25 PM

80 टक्क्यांपर्यंत भाजल्याने प्रकृती गंभीर : पीडित 11 वीची विद्यार्थिनी

';

वृत्तसंस्था/ अमरावती

आंध्रप्रदेशच्या कडप्पा जिल्ह्यात एका युवकाने स्वत:च्या एक्स गर्लफ्रेंडला  आगीच्या हवाली केले आहे. पीडित मुलगी इयत्ता 11 वीची विद्यार्थिनी असून ती 80 टक्क्यांपर्यंत भाजली आहे.  तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीचे नाव विग्नेश असून तो पीडितेला खूप वर्षांपासून ओळखत होता. शनिवारी दोघेही भेटले होते आणि त्यादरम्यान त्यांच्यात भांडण झाले होते. यानंतर विग्नेशने मुलीला आगीच्या हवाली केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विग्नेश हा विवाहित असूनही स्वत:च्या एक्स-गर्लफ्रेंडसोबतचे नाते कायम ठेवू इच्छित होता. कडप्पा जिल्ह्dयातील बदवेल येथे ही घटना घडली आहे. विग्नेशने अलिकडेच अन्य युवतीसोबत विवाह केला होता. विग्नेशने शनिवारी स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला फोन करून भेटण्यासाठी हट्ट केला होता.

भेटण्यास न आल्यास आत्महत्या करेन अशी धमकी विग्नेशने तिला दिली होती. धमकीमुळे पीडिता त्याला भेटण्यास तयार झाली होती. ती कॉलेजमधून रिक्षात बसून त्याला भेटण्यासाठी पोहोचली होती. दोघेही बदवेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील एका कारखान्यानजीक पोहोचले. तेथे दोघांदरम्यान भांडण झाले आणि आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले.

पेटणाऱ्या मुलीला पाहून तेथे काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी पोलिसांना कळविले. पीडितेच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून शेतकरी तिच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी आग विझविली. तोपर्यंत आरोपी तेथून फरार झाला होता. पोलिसांनी पीडितेला बदवेल येथील रुग्णालयात दाखल पेले आहे. त्यानंतर तिला कडप्पा येथील राजीव गांधी इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये हलविण्यात आले आहे. पीडिता 80 टक्क्यांपर्यंत भाजल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.

मुख्यमंत्र्यांचा आदेश

आरोपीला पकडण्यासाठी चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रारंभिक तपासानुसार आरोपी आणि पीडिता एकाच भागात राहत होते आणि बालपणापासून परस्परांना ओळखत होते अशी माहिती कडप्पाचे पोलीस महासंचालक हर्षवर्धन यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पोलिसांना आरोपीला तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी फोनवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पीडितेच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.