Malegaon Central Assembly Election 2024 : कॉंग्रेसमध्ये इच्छुकांत रस्सीखेच
esakal October 21, 2024 06:45 PM

मुस्लीमबहुल असलेल्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे राजकारण दिवंगत नेते निहाल अहमद व रशीद शेख यांच्या कुटुंबीयांभोवतीच फिरत राहिले. गेल्या निवडणुकीत मात्र याला छेद देत मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी एमआयएमच्या उमेदवारीवर विजयश्री खेचून आणली. यावेळी श्री. शेख यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार पुन्हा रिंगणात असतील.

जवळपास तीन दशके मालेगावचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या निहाल अहमद यांच्या कन्या शान-ए-हिंद समाजवादी पक्षाच्या उमेदवारीवर नशीब आजमावणार आहेत. महाविकास आघाडीत ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे येथे चौरंगी लढत लक्षवेधी ठरेल. (Malegaon Central Assembly Tug of war between aspirants in Congress)

सर्व राजकीय नेते कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागे खंबीरपणे उभे होते. त्यामुळे त्यांना दोन लाखाच्या आसपास घसघशीत आघाडी मिळाली. महाविकास आघाडीत जागा कॉंग्रेसला सुटणार ही शक्यता लक्षात घेऊन माजी आमदार शेख यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

उपमुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात असले तरी ते महायुतीकडून उमेदवारी करण्याची शक्यता धुसर आहे. कॉंग्रेसकडून महानगराध्यक्ष एजाज बेग इच्छुक आहेत. मौलाना उम्रेन यांच्या नावाचीही चर्चा आहे. माजी आमदार शेख यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी करावी असा त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न आहे.

अशी आहे स्थिती

- मुस्लीमबहुल मतदारसंघ; ३ लाख ४० हजारात जेमतेम १२ हजार हिंदू मतदार

- कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही

- समाजवादी पक्षाच्या एंट्रीने मतांचे ध्रुवीकरण होणार

- एमआयएम, समाजवादी पक्षाचे उमेदवार घोषित

- कॉंग्रेसची उमेदवारी कोणाला, याविषयी उत्सुकता

- मतदारसंघात चौरंगी लढतीची शक्यता

असे आहेत निवडणूक मुद्दे

- शहराचा रखडलेला विकास

- बहुचर्चित भुयारी गटार व उड्डाण पुलाचे काम

- यंत्रमाग व्यवसायातील प्रलंबित प्रश्न कायम

- आसिफ शेख व मौलाना मुफ्ती यांनी बदललेल्या भूमिका

- शहराचा पूर्व-पश्चिम भागातील विकास कामांमध्ये दुजाभाव

--------

२०१९ चे चित्र

विजयी - मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (एमआयएम)- १,१७,२४२

पराभूत - आसिफ शेख (कॉंग्रेस) - ७८,७२३

मताधिक्य : ३८,५१९

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.