Malegaon Outer Assembly Election 2024 : मतांच्या ध्रुवीकरणामुळे रंगणार चुरस
esakal October 21, 2024 06:45 PM

गेल्या चाळीस वर्षापासून नेतृत्व करीत असलेल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात यावेळी चुरशीचा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार व पालकमंत्री दादा भुसे सलग पाचव्यांदा शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. (Malegaon Outer Assembly tough fight Due to polarization of votes)

श्री. भुसे यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी व (उबाठा) पक्षाचे नेते बंडुकाका बच्छाव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे रणशिंग फुंकले आहे. भुसे व हिरे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांबरोबरच बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत.

सध्या हीच चर्चा मतदारसंघात आहे. गेल्या काही वर्षात भुसे यांनी करोडो रुपयांचा निधी आणून लक्षवेधी कामे केली आहेत. भरीव विकासकामांच्या जोरावर मतदार पुन्हा संधी देतील असा त्यांना विश्वास आहे. युवानेते अद्वय हिरे यांनी भुसेंसमोर आव्हान उभे करतांनाच हिरे कुटुंबियांचा पारंपरिक मतदार संघ पुन्हा मिळविण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

आजवर केलेल्या सामाजिक कामांचा लेखाजोखा मांडत बंडुकाका मतदारांसमोर जात आहेत. तीनही उमेदवार तुल्यबळ असून उमेदवारी दाखल करण्यापुर्वीच एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपात होत असलेली टिका चिंतेचा विषय आहे. आदिवासी, दलित व मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होणार असल्याने निवडणूक चुरशीची होईल.

अशी आहे स्थिती

- पालकमंत्री दादा भुसे व युवानेते अद्वय हिरे यांची उमेदवारी निश्चित

- बंडुकाका बच्छाव अपक्ष लढतात की तिसऱ्या आघाडीकडून याबाबत उत्सुकता

- बंडुकाका बच्छाव रिंगणात उतरणार असल्याने हाय होल्टेज लढत अपेक्षित

- भुसे पाचव्यांदा विजयी होणार की मतदारसंघाला हिरे किंवा बच्छाव यांच्यापैकी नवा प्रतिनिधी मिळणार

- ग्रामीण भागाबरोबरच शहरातील कॅम्प - संगमेश्वर या शहरी भागातील मतदार निर्णायक

- तीनही प्रमुख उमेदवार मातब्बर असल्याने निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष

निवडणुकीतील मुद्दे

- मालेगाव शहर व तालुक्यात झालेली विकासकामे, मालेगाव जिल्हा निर्मितीचा रखडलेला प्रश्न, मांजरपाडा-२ प्रकल्प कागदावरच, जिल्हा बँक प्रकरणी अद्वय हिरेंवर झालेली कारवाई, राजकीय स्वार्थासाठी नेत्यांनी बदलेल्या भूमिका

चित्र २०१९ चे

दादा भुसे

(शिवसेना)

मिळालेली मते - १,२१,२५२

मताधिक्य - ४७,६८४

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.