Assembly Elections 2004 : 'या' पक्षाची उमेदवारी नरसिंगरावांनी स्वीकारली आणि फक्त 11 मतांनी ते विजयी झाले'
esakal October 21, 2024 06:45 PM

भरमू पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आले व त्यांनी सत्ता स्थापन केली.

Assembly Elections : २००४ ची निवडणूक जाहीर झाली. त्या निवडणुकीत कै. नरसिंगराव पाटील (Narsingrao Patil) केवळ ११ मतांनी विजयी झाले. हा अकरा मतांचा विजय चर्चेचा ठरला होता.

१९९९ च्या विधानसभेत एकमेकांविरोधात लढलेले (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यात राष्ट्रवादीकडून (NCP) कै. नरसिंगराव पाटील हे विजयी झाले होते. विद्यमान आमदार ते राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणून कै. पाटील यांनाच २००४ मध्ये उमेदवारी मिळेल, अशी शक्यता होती; पण मंत्रिपद नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याचवर्षी ‘वारणा’ समूहाचे डॉ. विनय कोरे यांनी ‘जनसुराज्य शक्ती’ पक्ष स्थापन केला होता.

या पक्षाची उमेदवारी कै. नरसिंगरावांनी स्वीकारली आणि केवळ ११ मतांनी ते विजयी झाले. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून (Shiv Sena) लढलेले माजी मंत्री भरमू पाटील हे पराभूत झाले. कै. नरसिंगराव पाटील हे दिवंगत खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांचे व्याही. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात जी भूमिका कै. मंडलिक यांची असेल तीच कै. नरसिंगराव यांची असे. कै. मंडलिक यांनी ज्यावेळी शरद पवार यांची साथ सोडली, त्यावेळी कै. नरसिंगराव हेही त्यांच्यासोबत होते.

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाणाऱ्यात माजी मंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्यानंतर कुणाचा नंबर लागत असेल, तर तो कै. मंडलिक व कै. नरसिंगरावांचा लागत असे. या जोरावरच १९९९ मध्ये चंदगडमधून (Chandgad) कै. नरसिंगराव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सुरेशराव चव्हाण-पाटील व १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले विद्यमान आमदार भरमू पाटील पुन्हा रिंगणात होते. या निवडणुकीत त्यांनी सात हजार मतांनी विजय मिळवला.

भरमू पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आले व त्यांनी सत्ता स्थापन केली. यात आपल्याला संधी मिळावी यासाठी कै. नरसिंगराव यांचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांना संधी मिळाली नाही. २००४ च्या निवडणुकीत कै. नरसिंगराव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली व डॉ. कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ची उमेदवारी स्वीकारली. त्यावेळी रिंगणात दहा उमेदवार होते. माजी मंत्री भरमू पाटील हे शिवसेनेकडून, तर राष्ट्रवादीकडून कै. नरसिंगराव यांचे मेहुणे गोपाळराव पाटील रिंगणात उतरले. अतिशय अटीतटीने झालेल्या या निवडणुकीत कै. नरसिंगराव हे केवळ ११ मतांनी विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भरमू पाटील यांचा पराभव झाला.

कोर्टात आव्हान, कारकीर्द पूर्ण

या दोघांचा ११ मतांचा विजय आणि पराभव हा जिल्ह्याच्या राजकारणातील एक मैलाचा दगड ठरला. जिल्ह्याच्या इतिहासात एवढ्या कमी मतांचे मताधिक्य घेऊन कुणाचाही निकाल लागला नव्हता. या निकालाविरोधात भरमू पाटील यांनी कोर्टात आव्हान दिले, पण त्याचा निकाल लागेपर्यंत कै. नरसिंगराव यांची आमदारकीची कारकीर्द पूर्ण झाली होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.