Maharashtra Politics: काहीही झालं तरी भाजपचा प्रचार करणार नाही, चिंचवडमध्ये अजित पवार गटाची ठाम भूमिका
Saam TV October 21, 2024 10:45 PM
गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रत्येक पक्षाकडून जाहीर केली जात आहे. काही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महायुतीमधील भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप उमेदवारांची यादी झाल्यानंतर नारजी नाट्याला सुरूवात झाली. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे भाजपचे काही जण नाराज झाले आहेत. तर काही इतर पक्षाचे पदाधिकारी देखील नाराज झाले आहेत. अशातच महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा भाजपला गेल्यामुळे अजितदादांनी दिलेला शब्द फिरवला, असं म्हणत चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांना घरचा आहेर दिलाय.

रविवारी चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नाना काटे आणि प्रशांत शितोळे हे इच्छुक उमेदवार होते. पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही तासांतच एक बैठक बोलावत थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळं महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतलीये.

या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे टेन्शन वाढले आहे. आता नाराज अजित पवार गट नेमकी काय भूमिका घेतंय? किंवा या सर्वांची नाराजी दूर केली जातेय की नाही? हे पाहणं महत्वाचे ठरेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.