पंचनामे न केल्यास मतदानावर बहिष्कार
esakal October 22, 2024 10:45 PM

वाडा, ता. २२ (बातमीदार) : परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यात थैमान घातले असून आज (ता. २२) दहाव्या दिवशीही पाऊस थांबायला तयार नाही. यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नुकसानीला १० ते १२ दिवस उलटूनही आतापर्यंत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही पाहणी अथवा शेतीचे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केलेले नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे वाडा कृषी अधिकारी हरीश मकर यांनी सांगितले, मात्र पालघर आणि भिवंडी तालुक्यात पंचनामे सुरू झाले, मग वाड्यात दुर्लक्ष का, असा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संतप्त सवाल केला आहे. कुडूसचे माजी उपसरपंच ईरफान सुसे यांनी अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करून येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.