Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 900 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान
esakal October 23, 2024 02:45 AM

Share Market Closing Latest Update 22 October 2024: मंगळवारी (22 ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 309 अंकांनी घसरून 24,472 वर बंद झाला. सेन्सेक्स 930 अंकांनी घसरून 80,220 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 705 अंकांनी घसरून 51,257 वर बंद झाला.

बँक निफ्टी 700 अंकांनी घसरून 51,300 च्या खाली गेला. मिडकॅपमध्ये 1500 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळत होती. त्याच वेळी, स्मॉलकॅप निर्देशांक देखील 700 अंकांच्या घसरणीसह 18700 च्या खाली गेला. शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 8.50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

चीनच्या अर्थव्यवस्थेत तरलता वाढेल

काही काळापूर्वी चीनची मध्यवर्ती बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलले होते. सेंट्रल बँकेने आता व्यावसायिक बँकांना राखीव निधी ठेवण्यासाठी असलेल्या पैशाचा आकार कमी केला आहे. चीनच्या सेंट्रल बँकेच्या या निर्णयामुळे तेथील बँकांकडे सुमारे 142.6 अब्ज डॉलरची अतिरिक्त तरलता वाढणार आहे.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक झाली कमी

ऑक्टोबरमध्ये FPIs ने भारतीय शेअर बाजारातून 82,479 कोटी रुपये काढून घेतले. ट्रेंडलाइनच्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी असे कोविडच्या काळात घडले होते.

मार्च 2020 मध्ये FPI ने 65,816 कोटी रुपये काढले होते. ऑक्टोबर महिन्यात एकाच दिवसात सर्वाधिक घसरण 3 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्या दिवशी 15,506 कोटी रुपयांचा FPI गुंतवणूक बाहेर गेली होती.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ एक शेअर वाढीसह बंद झाला तर 29 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 3 शेअर्स वाढीसह आणि 47 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

वाढत्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक 0.74 टक्के, नेस्ले 0.10 टक्के, इन्फोसिस 0.04 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर बीईएल 3.79 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.63 टक्के, कोल इंडिया 3.36 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 3.29 टक्के, एसबीआय 2.97 टक्के, पॉवर ग्रीड 2.79 टक्के घसरले.

गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान

भारतीय शेअर बाजारातील घसरणीच्या वादळामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर शेअर्सचे मार्केट कॅप 444.79 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 453.65 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना 8.84 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गेल्या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.