कोकणात शिवसेना विरूद्ध शिवसेना लढती
esakal October 23, 2024 02:45 AM

कोकणात ‘शिवसेना’ विरूद्ध ‘शिवसेना’

विभाजनाचा फटका; बहुसंख्य जागांवर ‘काँटे की टक्कर’

राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : गेली पंचवीस वर्षे वर्चस्व अबाधित राखणाऱ्या आणि ग्रामीण भागात घराघरांत रूजलेल्या शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी दोन तुकडे झाले. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय समीकरणे पुरती बदलली. या विभाजनाचा फटका सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला बसला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठपैकी पाच ते सहा जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना, अशी ‘काँटे की टक्कर’ अनुभवायला मिळणार आहे.
मुंबईशी नाळ असलेल्या कोकणी माणसाला हिंदुहृदयसम्राट (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे पाठबळ दिले. ठाकरे यांचे विचार आणि मराठी माणसासाठी असलेली अस्मिता यामुळे अनेक कोकणी माणसे आपसूकच शिवसेनेकडे वळली. हळूहळू जिल्ह्यात शिवसेना चांगलीच वाढली. घराघरात शिवसेनेचा धनुष्यबाण पोहचला. त्याला साथ मिळाली ती भाजपची. त्यामुळे गेली ३० वर्षे शिवसेना-भाजप युतीने कोकणावर अधिराज्य गाजवले. जिल्ह्यातील पाच मतदार संघात युतीचा दबदबा होता. तीन शिवसेना तर दोन भाजपचे आमदार होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले. उदय सामंत यांनी २००४ मध्ये भाजपचे आमदार बाळ माने यांचा पराभव केला तर गुहागरमध्ये आमदार विनय नातू यांचा भास्कर जाधव यांनी पराभव करत भाजपचा पारंपरिक मतदार संघ काबीज केला. रत्नागिरी मतदार संघातून उदय सामंत तर दापोलीतून संजय कदम आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगलाच जम बसवला.
--
२०१४ पासून पुन्हा समीकरणे बदलली
२०१४ पासून पुन्हा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. सामंत यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ उतरवून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना मजबूत झाली. २०१९च्या निवडणुकीत सेना-भाजपने बाजी मारली; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीला घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. या सर्व घडामोडींमध्ये निष्ठावंत शिवसैनिक आहे तिथेच राहिला; परंतु अडीच वर्षानंतर पुन्हा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेचे दोन तुकडे झाले.
---
निष्ठावंत कार्यकर्ता मात्र भरडला
एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट करत शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही मिळवली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मशाल चिन्ह घेऊन शिवसेना उभी केली. २५ वर्षांत भक्कम उभी राहिलेली आणि अनेक राजकीय चढ-उतारांचा सामना करणारी शिवसेना फुटली. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकमेकांविरूद्ध उभ्या ठाकणार आहेत. रत्नागिरीत पाच आणि सिंधुदुर्गमधील ३ अशा आठपैकी जवळजवळ पाच किंवा सहा मतदार संघांत हे चित्र पाहायला मिळणार आहे. राजकीय स्थित्यंतरात सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता मात्र भरडला गेला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.