Diwali Recipe : गोड नेहमीच बनवताय, यंदा खारी शंकरपाळी ट्राय करा, फराळाची चवच बदलेल
esakal October 23, 2024 02:45 AM
 Diwali Faral Recipe :

दिवाळीच्या फराळात कितीतरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. पण सगळ्यांच्या उड्या पडतात त्या खमंग आणि तिखट पदार्थांवर. म्हणूनच खमंग चिवडा आणि चकली हे लगेचच फस्त होतं. तर करंजी, लाडू अनेक दिवस डब्यात घर करून बसतात.

तिखटाच्या पदार्थांमध्ये सध्या खारी शंकरपाळीही बनवली जाते. चवीला मस्त, कुरकुरीत खारी शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. शंकरपाळी बनवणे सोपे आहे, त्याची रेसिपी नोट करा. (Spicy Shankarpali Recipe)

साहित्य :

४ वाट्या मैदा, ८ टे. स्पून कडकडीत तेल (मोहनाला), मीठ चवीनुसार, १ टी स्पून काळे मिरे, १ टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून ओवा अर्धवट कुटून, तळण्याकरता तेल अथवा वनस्पती तूप

कृती

मैदा चाळून घ्यावा. त्यात अर्धवट कुटून ओवा, मिरे व जिरे घालावे. मीठ घालून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावा.

एक तासाने पीठ चांगले मळून त्याचे ६ भाग करावेत व १ भागाची पोळपाटावर पातळ मोठी पोळी लाटावी. कातण्याने अथवा सुरीने शंकरपाळी कापावीत.

पसरट कढईत तेल अथवा तूप तापवून मंद आचेवर गुलाबी रंगात तळावीत. वरील साहित्यात अंदाजे अर्धा किलो खारी शंकरपाळी होतात.

मिरे व जिरे कुटून घातल्याने खमंगपणा येतो. मीठपण किंचित जास्त असावे. बरेच दिवस टिकतात. प्रवासात पण नेता येतात. पातळ लाटल्याने फुलून येऊन कुरकुरीत होतात. जाड लाटली तर नंतर मऊ पडतात. मंद आचेवरच तळावीत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.