तस्लिमा नसरीनला राहण्याची परवानगी
Marathi October 23, 2024 06:24 AM

भारतीय वास्तव्य परवान्याची मुदत वाढली : केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागितली होती मदत

';

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांचा भारतातील वास्तव्याच्या परवान्याची मुदत वाढविली आहे. यानंतर तस्लीमा नसरीन यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

बांगलादेशी लेखिकेने मंगळवारीच एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत गृहमंत्र्यांकडे मदत मागितली होती. माझ्या भारतीय वास्तव्याच्या परवान्याची मुदत जुलैमध्ये संपुष्टात आली होती. भारत माझे दुसरे घर असून परवान्याचे नुतनीकरण न झाल्याने मी त्रस्त आहे. सरकारने जर मला भारतात राहण्याची अनुमती दिली तर मी आभारी राहणार असल्याचे तस्लीमा यांनी नमूद केले होते.

2011 पासून भारतात वास्तव्य

तस्लीमा नसरीन या 2011 पासून भारतात वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे स्वीडनचे नागरिकत्व आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा वास्तव्य परवान्याची मुदत न वाढल्याप्रकरणी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीच माहिती न मिळाल्याने चिंता व्यक्त केली होती.

तस्लीमा यांच्या लेखनामुळे 1994 मध्ये बांगलादेशात त्यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आला होता. त्यांची कादंबरी ‘लज्जा’ (1993) आणि आत्मकथा ‘अमर मेयेबेला’ (1998) या पुस्तकांमुळे कट्टरवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. लज्जा या कादंबरीत भारतात बाबरी ढांचा पाडण्यात आल्यावर बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन आहे. कादंबरीत बलात्कार, लूट आणि हत्याच्या घटनांचा उल्लेख होता. यामुळे बांगलादेशातील धार्मिक कट्टरवादी बिथरले होते. तीव्र विरोधामुळे नसरीन यांना बांगलादेश सोडावा लागला होता.

तेव्हापासून त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. त्यांनी भारतात आश्रय घेतला, परंतु येथे देखील त्यांना वारंवार स्वत:चा ठावठिकाणा बदलावा लागला आहे. त्या पूर्वी कोलकाता आणि मग जयपूर येथे वास्तव्यास होत्या, मग दिल्लीत स्थायी वास्तव्य परवान्याच्या अंतर्गत स्थायिक झाल्या.

तस्लीमा या अनेक वर्षांपर्यंत युरोपमध्ये देखील राहिल्या आहेत. 2004-05 दरम्यान त्या भारतात दाखल झाल्या. प्रारंभी त्या कोलकाता शहरात वास्तव्यास होत्या. 2007 मध्ये त्या जयपूर येथे स्थलांतरित झाल्या आणि आता त्या दिल्लीत वास्तव्यास आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.