‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा, विधानसभेच्या रणधुमाळीत छापेमारी
Marathi October 23, 2024 09:24 AM

‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान अभिजित कटके यांच्या पुण्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. अभिजित कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.

पै. अभिजित कटके यांचे वडील चंद्रकांत कटके यांच्या वाघोलीतील घरात मंगळवारी सकाळीच आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले. पथकाने कागदपत्रांची झाडाझडती घेत कटके यांच्याकडे विचारपूसही केली. दरम्यान, कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे चंद्रकांत कटके हे सासरे आहेत. त्यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, पै. अभिजित कटके एकदा ‘महाराष्ट्र केसरी’, तर दोन वेळा ‘उपमहाराष्ट्र केसरी’चे मानकरी ठरले आहेत. पुण्यातील शिवरामदादा तालमीचे ते पैलवान आहेत. अभिजित कटके यांनी 2015मध्ये ‘युवा महाराष्ट्र केसरी’चा मान मिळविला असून 2016मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपमधून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात दंड थोपटून बंडखोरीची घोषणा केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे भाजपचा राजकीय डाव असल्याची चर्चा रंगली आहे.

सासऱ्यांच्या आडून जावयावर ‘नेम’!

भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांना संबंधित मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाकनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्यासोबत चर्चा केली होती. बालवडकरांचे सासरे चंद्रकांत कटके यांचे वाघोलीत घर आहे. त्या ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे सासऱ्यांच्या आडून जावयावर ‘नेम’ धरल्याची चर्चा सुरू आहे.

शिरूरमध्येही माजी नगरसेवकांच्या घरावर छापा

आयकर विभागाने शिरूरमध्येही माजी नगरसेवकांच्या घरावर छापा टाकून कारवाईचा बडगा उगारला. माजी नगरसेवकांच्या घरी पथक धडकल्यामुळे परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. पथकाने संबंधितांकडील कागदपत्रे तपासली आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.