गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन, शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज
सुनील दिवाण, एबीपी माझा October 23, 2024 01:13 PM

Shahajibapu Patil On Sanjay Raut: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून सर्व 40 विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी गुवाहाटीला गेलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना तिकीट देण्यात आलं आहे. सांगोल्यातून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. 

सांगोल्याचे विद्यामान आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत हा महाराष्ट्रात भुंकणारा कुत्रा आहे. माझ्याविरोधात संजय राऊत, त्याचा बाप, आजा यांनी एक नाही तर दहा सभा घेऊ देत...मी त्याला पालथा पाडून तुडवून पुढे जाऊन दाखवणार...उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाहीय. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे काही मुद्दाच नाही, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. आज संजय राऊतांना सांगतो, तुम्ही सात-आठ सभा घ्या, मी विजयाचा गुलाल उधळला नाही, तर फास घेऊन मरेन, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. 

रोहित पवार पैसे मोजायला गेले होते का? 

पुणे येथे सापडलेले पैसे हे रफिक शेख यांचे होते त्यांनी ते कबूलही केले असून ते मोठे व्यापारी आहेत. त्यांचे पैसे आहेत, अशी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. हे पैसे एका व्यापाऱ्याचे असताना विनाकारण एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार करीत आहेत. पाठवलेले पैसे पाच कोटी पेक्षा जास्त असल्याचा आरोप करणारे रोहित पवार रफिक भाईंचे पैसे मोजायला गेले होते का? असा टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला. रफिक भाईची श्रीमंती संपूर्ण तालुक्याला माहीत असून त्यांनी हे पैसे आपले असल्याचे सांगितल्याने आता हा विषय संपलेला आहे, असंही शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षातील दोन भावांचे मनोमिलन झाले, तरी मला याचा कसलाही फरक पडणार नाही. दोन काय तीन-चार किती भाऊ एकत्र आले तरी त्यांच्या आज्या सोबत सात वेळेला मी लढलेलो आहे, त्यामुळे शेकाप वगैरे असा मला कसलाही फरक पडत नाही, असं शहाजीबापू म्हणाले. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.