राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी थेट मतदारांना चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळत आहे. मतदार संघातील विकास कामे न झालेले एक गाव दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, असं थेट चॅलेंज आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी मतदारांना दिलं आहे. नागरिकांसमोर बोलताना तानाजी सावंत म्हणाले, गेल्या साठ वर्षात सर्वाधिक विकास कामे केली. मतदारसंघात दीडशे ते दोनशे कोटी रुपये विकास निधी आणला, असा दावा तानाजी सावंत यांनी गावभेटी बैठकी दरम्यान केला आहे. तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान, तानाजी सावंत यांनी मतदारांना असं एक लाख रूपयांचं चॅलेंज दिलं असून तानाजी सावंत यांनी मतदारांना दिलेल्या या चॅलेंजची सध्या मतदारसंघात जोरात चर्चा सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तानाजी सावंत यांची शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल मोटे यांच्याशी लढत होणार आहे.