नवीन मेळा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधील दागिने व रोकड अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केली. गायत्री राहुल पाटील (रा. अमृतधाम, साईनगर, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.३) सकाळी पावणे दहाच्या सुमारास त्या नवीन मेळा बसस्थानकात आल्या. धुळे जाणार्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या बॅगेतील पर्स अज्ञात चोरट्याने लंपास केली. पर्समध्ये सोन्याचे दागिने व दीडहजारांची रोकड असा २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A woman’s jewelery is stolen while boarding a bus)
विकास गोविंदा पाटील (रा. विवेक संकुल, सिन्नर ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची पत्नी प्रतिभा पाटील या पाचोरा जाण्यासाठी बसने (एचडीएल १४३४) जात असताना, ठक्कर बाजार बसस्थानक ते द्वारका या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५० हजारांची सोन्याची पोत व ४ हजार ७०० रुपयांची रोकड असा ५४ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून लंपास केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तर तिसरी घटना नाशिकरोड ते चेहेडी या दरम्यान घडली. अनिता यशवंत वराडे (रा. स्टेशनवाडी, सिन्नर फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.३) दुपारी चारला त्या नाशिकरोड बसस्थानकातून शिवशाही बसमधून प्रवास करीत असताना नाशिकरोड ते चेहेडी गाव या दरम्यान गर्दीमध्ये अज्ञात संशयिताने वराडे यांच्याकडील हॅण्डबॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा १६ हजार २०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.