कराची: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तान करणार आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा करणार की नाही याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं नरमाईची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा वापर करण्यास तयार झालं असल्याची माहिती आहे. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईत खेळवले जातील, अशी शक्यता आहे. भारत सरकारनं अद्याप कोणत्याही क्रिकेट मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास परवानगी दिलेली नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आशिया कप 2023 चं आयोजन ककेलं होतं. त्यावेळी हायब्रीड मॉडेलचा वापर करण्यात आला होता. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत झाले होते. पीसीबीनं भारत सरकारनं पाकिस्तान दौऱ्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर न केल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात काही दुरुस्ती करण्यास तयारी दर्शवली आहे. भारताचे सामने दुबई आणि शारजाहमध्ये खेळवले जाण्याची शक्यता असल्याची माहिती पीसीबीच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
आयसीसी देखील एखाद्या क्रिकेट बोर्डाला त्यांच्या देशातील सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेण्यास सांगणार नाही. याशिवाय जय शाह हे सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं अखेरचा निर्णय देखील कसा असेल याचा अंदाज आल्यानं पीसीबीनं नरमाईची घेतली असावी.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात यावं यासाठी आयसीसीकडे जोर लावला जात आहे. आयसीसीचे काही अधिकारी पुढील आठवड्यात लाहोरचा दौरा करणार आहेत. त्या दौऱ्यात पीसीबी त्यांनी यापूर्वी पाठवलेल्या वेळापत्रकावर आयसीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक 11 नोव्हेंबरला जाहीर व्हावं, अशी पीसीबीची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पीसीबीकडून यापूर्वी आयसीसीला विनंती करण्यात आली होती की बीसीसीआयनं भारताची टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठवण्यासंदर्भात कळवावं. भारत सरकारकडून पाकिस्तनाला क्रिकेट टीम पाठवण्यास नकार दिला जात आहे याचं बीसीसीआयनं लेखी द्यावं, अशी भूमिका यापूर्वी पीसीबानं घेतली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान स्पर्धा पार पडेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 1 मार्चला होणार आहे. स्पर्धेची सुरुवात 19 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं होणार आहे.
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर 9 मार्च 2025 प्रस्तावित आहेत. भारताचे सर्व सामने यापूर्वी लाहोरच्या मैदानात घेण्याचं पीसीबीचं नियोजन होतं. पीसीबीनं कराची, लाहोर आणि रावळपिडींच्या स्टेडियमच्या विकासासाठी 13 अब्ज रुपये खर्च केले होते.
इतर बातम्या :
अधिक पाहा..