मुंबई - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांसाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. अवघ्या ११ दिवसांत त्यांच्या ४२ सभा होतील. दररोज चार सभांचे नियोजन आहे. मविआच्या संयुक्त प्रचार दौऱ्यातही ते सहभागी होणार आहेत. पवार यांच्या सर्वाधिक सभा या पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याने अजित पवार यांची चिंता वाढणार आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ८७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ उमेदवार उभे केले आहेत. उत्तर महाराष्ट्र १८, मराठवाडा १५, विदर्भ १२ आणि मुंबई कोकण विभागात ११ उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः राज्यभर दौरे करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यावरही प्रचाराची धुरा देण्यात आली आहे. इतर ४० स्टार प्रचारक देखील प्रचारात उतरणार आहेत.
एकेकाळचे शरद पवार यांचे निष्ठावंत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी भाजपमधून ‘राष्ट्रवादी’त आलेल्या समरजितसिंह घाटगे यांना शरद पवार यांनी कागलमधून उमेदवारी दिली आहे. घाटगे यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपस्थितीत असलेल्या शरद पवार यांनी कागल येथे मुश्रीफ यांचा समाचार घेतला. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारात कागल येथे पवार यांची सभा होणार नसल्याचे दिसत आहे.
खरी लढत काका-पुतण्यात
शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामती विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडला. या मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी राज्यातील सर्वाधिक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी लढत होत आहे. मात्र खरी लढाई ही ‘शरद पवार विरुद्ध अजित पवार’ अशीच रंगणार आहे. प्रचाराची सुरुवात आणि सांगता देखील शरद पवार यांच्या बारामती येथील सभेनेच होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ८७ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. या सर्व ठिकाणी शरद पवार यांना जाणे शक्य होणार नाही. यापैकी निवडक मतदारसंघांत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही ते १४ दिवसांत ५६ सभा घेणार आहेत. यातूनही ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी सभा देण्याचे नियोजन केले जाईल.
- रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष
अशा होणार सभा
८ नोव्हेंबर : हिंगणघाट जिंतूर ,बसमत
९ : उदगीर, परळी वैजनाथ, आष्टी ,बीड
१० : भूम -परांडा, शेवगाव-पाथर्डी, गंगापूर, घनसावंगी
११ : एरंडोल, सिंदखेड, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण
१२ : कळवण, दिंडोरी, सिन्नर, येवला, कोपरगाव
१३ : श्रीवर्धन, जुन्नर, आंबेगाव, खेड -आळंदी ,भोसरी
१४ : शिरूर, खडकवासला, चिंचवड
१५ : तासगाव, चंदगड, कऱ्हाड उत्तर
१६ : वाई, कोरेगाव, माण, फलटण
१७ : करमाळा, माढा, कर्जत- जामखेड
१८ : भोर, दौंड, इंदापूर, बारामती
#ElectionWithSakal