रामटेक : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या याच योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजुचे नेते आपल्या प्रचारसभांमध्ये चढाओढीनं रक्कमा वाढवताना दिसत आहेत. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक इथं महायुतीचे उमेदवार आशिष जैयस्वाल यांच्या प्रचारादरम्यान एक मोठी घोषणा केली. आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
रामटेकच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकनाथ शिंदे शेतकरी, सामान्य कुटुंबातून आला आहे. माझी आई कशी काटकसर करायची हे मी पाहिलं आहे. आचासंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील. तुम्ही आमची ताकद वाढवाल तशी लाडकी बहिणीची रक्कमही आम्ही वाढवू.
लाडकी बहीण योजनेत २१०० रूपये द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसंच शेतकऱ्यांच कर्ज माफ करायचं निर्णय आपणं घेतला. जीवनावश्क वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला. अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये देण्याचं निर्णयही घेतला. त्यानंतर ता सरकार स्थापन झाल्यावर व्हिजन महाराष्ट्र शंभर दिवसांत मांडू, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे जून २०२४ पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आत्ता नोव्हेंबर २०२४ पर्यंतचे पैसेही महिलांना मिळाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्यानं या महिन्यातील पैसे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जमा करण्यात आले.
पण आता याच नोव्हेंबर महिन्यात २० तारखेला निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळं सहाजिकच निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता देखील संपुष्टात येईल. त्यामुळं आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर सभेत दिलं. पण त्यासाठी शिंदेंना पुन्हा सत्तेत परतावं लागणार आहे. म्हणजेच पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाली तरच हे शक्य होणार आहे.