नांदेड : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना घडली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. लक्ष्मण हाके यांच्या कारच्या मागच्या बाजूच्या काच फोडण्यात आल्याचे दिसून आले आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी इथे हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
बाचोटी येथून जात असताना काही अज्ञात लोकांनी तोंड बांधून गाडीवर हल्ला करत त्यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली. ओबीसींनी त्यांच्या हक्कांचं रक्षण करायचं नाही का, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. आमच्या गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला, असे हाके यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाके यांनी याप्रकारासंदर्भात बोलताना हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचे म्हटले आहे. आमचा जीव घेऊन कुणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर तयार आहोत, असे हाके म्हणाले. आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावाने घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिलं जाणार की नाही, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
कंधार तालुक्यातील पोलिसांना माहिती देऊनही वाय दर्जाची सुरक्षा असूनही एक कॉन्स्टेबल नव्हता, असे लक्ष्मण हाके म्हणाले. लातूरमध्ये पोलिसांनी संरक्षण दिले होते, नांदेडमध्ये एकही पोलीस संरक्षणाला नव्हता, असे लक्ष्मण हाके म्हणाले. आमच्या गाड्या त्या गावातून पास होत असताना गाड्या अडवण्यात आल्या, असे हाके यावेळी म्हणाले. उद्या कंधार पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत, असेही ते पुढे म्हणाले. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत कंधार पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन करणार आहोत, अशी माहितीही लक्ष्मण हाके यांनी दिली.
लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील त्यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. हाके यांची गाडी अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले .
त्यांनी देखील घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाद शमवला, अशी माहिती आहे.