दोन्ही देशांदरम्यान व्यापाराला मिळणार चालना
वृत्तसंस्था/गुवाहाटी
आसाममध्ये भारत-भूतान सीमेवर पहिली एकीकृत चेकपोस्ट सुरू झाली आहे. ही चेकपोस्ट (तपासणी नाका) आसामच्या दारंगा येथे स्थापन करण्यात आला आहे. या चेकपोस्टमुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोब्गे यांनी गुरुवारी या चेकपोस्टचे उद्घाटन केले आहे.
दारंगा येथे सुरू झालेली ही एकीकृत चेकपोस्ट 14.5 एकर क्षेत्रात फैलावलेली असून ही भारत-भूतान सीमेपासून 700 मीटर आत स्थित आहे. या चेकपोस्टमध्ये कार्यालय, पार्किंग स्थळ, माल भरणे अन् उतरविण्याची जागा, वजनमापक, गोदाम आणि कर्मचाऱ्यांसाठी आवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही चेकपोस्ट लँड पोर्ट्स अथॉरिटीकडून विकसित करण्यात आली आहे. या चेकपोस्टमध्ये सामग्रीची तपासणी करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
दारंगा येथील ही चेकपोस्ट दोन्ही देशांदरम्यान संपर्कव्यवस्थेची सुविधा चांगली असलेल्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. भारतात राष्ट्रीय महामार्ग 27 या चेकपोस्टशी संलग्न आहे. तर भूतानच्या दिशेने सामद्रुप-जोंगखार महामार्ग आहे. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत आणि भूतानदरम्यान 2022-23 मध्ये 160 कोटी डॉलर्सचा व्यापार झाला, भूतानच्या एकूण व्यापाराच्या तुलनेत हे प्रमाण 73 टक्के आहे. भारताकडून भूतानला पेट्रोल-डिझेल, वाहने, तांदूळ, मोबाइल, सोयाबीन तेल, वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रिक जनरेटर इत्यादींची निर्यात होते.