Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यांचा पहिला मेळावा (आज) शुक्रवारी धुळ्यात होणार आहे. त्यानंतर ते नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. ते राज्यात आठवडाभरात एकूण नऊ सभांना संबोधित करणार आहेत. भाजपच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.
गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात प्रदेश भाजपने म्हटले आहे की, पंतप्रधान 12 नोव्हेंबर रोजी पुण्यात रोड शो देखील करणार आहेत. "महाराष्ट्रातील माझ्या कुटुंबीयांनी विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारांना अभूतपूर्व विजय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. या उत्साहाच्या वातावरणात मी उद्या दुपारी बारा वाजता धुळ्यात जाहीर सभा घेऊन लोकांचे आशीर्वाद घेणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये दुपारी 2 वाजता जनतेला संबोधित करणार आहे, असं नरेंद्र मोदींच्या एक्स हँडलवर लिहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा शुक्रवारी दुपारी 12 वाजता उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे होणार आहे. यानंतर ते नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता जाहीर सभेला संबोधित करतील. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अकोल्यात आणि दुपारी 2 वाजता नांदेडमध्ये प्रचार करणार असल्याचे त्यात म्हटले आहे. 12 नोव्हेंबरला मोदी चिमूर आणि सोलापूरमध्ये सभांना संबोधित करतील आणि संध्याकाळी पुण्यात रोड शोमध्ये सहभागी होतील.
नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावर आज पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. जिल्ह्यातील भाजपच्या उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची दुपारी २ वाजता जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या सभेसाठी तब्बल १ लाख लोक जमवण्याच महायुतीचं नियोजन आहे. तर सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एसपीजी कमांडो, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील वाहतूक मार्गातही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. सभा स्थळी येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या बारामती मतदारसंघात निवडणूक रॅली काढण्याची विनंती केली नाही. ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या विरोधात लढत आहेत. राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांनाही अमित शहांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा त्यांच्या मतदारसंघात का नको आहेत, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, प्रचारासाठी फारसा वेळ शिल्लक नसल्याने हा निर्णय घेतला आहे. हे निवडणूक खर्चाच्या मर्यादेमुळे देखील असू शकते. यानंतर 14 नोव्हेंबरला मोदी राज्यात छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि मुंबई या तीन ठिकाणी सभांना संबोधित करतील.