Pandharpur Karthik Wari Accident: कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या दिंडीत घुसली दुचाकी; अपघातात चंदगडची वारकरी महिला ठार, दोन जखमी
esakal November 08, 2024 04:45 PM

सुमन यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली. शांत, संयमी स्वभावाच्या सुमन भक्ती मार्गात होत्या. वारीला जाताना गावातील सर्वांना भेटून गेल्या होत्या.

चंदगड : कार्तिक वारीसाठी (Kartik Wari 2024) निघालेल्या दिंडीत (Pandharpur Dindi) दुचाकी घुसून झालेल्या अपघातात चंदगडची वारकरी महिला ठार झाली. सुमन धोंडिबा पाटील (वय ५०, मोरेवाडी, ता. चंदगड) असे त्यांचे नाव आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (Ratnagiri-Nagpur Highway Accident) सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत काल दुपारी दोनच्या सुमारास अपघात झाला.

त्यात वारकरी श्रीपती गोविंद देसाई (हिंदगाव), अतुल रघुनाथ पाटील (अर्जुनवाडी) गंभीर जखमी झाले आहेत. मोरेवाडी पंचक्रोशीतील वारकऱ्यांची दिंडी रविवारी गावातून पंढरपूरला रवाना झाली होती. ही दिंडी काल दुपारी बोरगावमार्गे पंढरपूरच्या दिशेने पुढे जात होती. या दरम्यान तिघे वारकरी पाणी पिण्यासाठी पुढे चालत होते.

एका हॉटेलसमोर पाठीमागून मिरजेहून-शिरढोणकडे निघालेली दुचाकी (एमएच ०९ - जीडी ४३९१) दिंडीमध्ये घुसली. या गाडीची जोराची धडक बसल्याने सुमन पाटील यांच्या डोकीला मार बसला व त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना मिरजेतील शासकीय दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी देसाई व पाटील यांना येथेच दाखल केले आहे.

मोरेवाडीवर शोककळा

दरम्यान, सुमन यांच्या मृत्यूची बातमी गावात समजताच गावावर शोककळा पसरली. शांत, संयमी स्वभावाच्या सुमन भक्ती मार्गात होत्या. वारीला जाताना गावातील सर्वांना भेटून गेल्या होत्या. त्यांच्या मागे पती, तीन मुली असा परिवार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.