मालिकांसाठी नाही तर 'या' साठी भारतात परतली मृणाल दुसानिस, पती नीरजने सांगितलं खरं कारण
esakal November 08, 2024 11:45 PM

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानीस प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. तिने 'तू तिथे मी', 'असं सासर सुरेख बाई', 'हे मन बावरे' या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिची प्रत्येक मालिका हिट ठरली. मृणालवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे. मात्र करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न करून परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आता मृणाल पुन्हा एकदा मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. मात्र ती फक्त अभिनयासाठी भारतात परत आली नाहीये. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मृणालचा पती नीरज मोरे याने त्यांचं भारतात परत येण्याचं कारण सांगितलं आहे.

मृणाल आणि नीरज यांनी काही दिवसांपूर्वी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नीरजला त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल विचारणा करण्यात आली. याबद्दल बोलताना तो म्हणाला, 'मी खरं तर आयटीमधी होतो. १४ वर्ष मी आयटीमध्ये जॉब केला अमेरिकेत मला आयटीमध्ये कंटाळा आला होता. एकाच ठिकाणी बसून काम वगरे. आणि पहिल्यापासून वाटत होतं की स्वतःचं काहीतरी करावं. त्याच्यामुळे आम्ही दोघे मिळून एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहोत. ते मी आता सांगत नाही. थोड्या दिवसांनी ते सगळ्यांना कळेलच. तो प्लॅन आहेच. सोबतच जसा मी अमेरिकेत गेलो त्यानंतर माझी पण १४ वर्षानंतर ही पहिलीच दिवाळी आहे भारतातली.'

नीरज पुढे म्हणाला, 'आम्ही खूप उत्सुक आहोत. कुटुंब आनंदी आहे. आणि आम्हाला इथे राहायचं होतं कारण नुरवीला देखील आपल्या परंपरेबद्दल सगळं माहीत व्हावं. भारतात यायचा जो निर्णय होता तो यासाठीच होता. त्यामुळेच आम्ही भारतात आलो.' मृणाल आता लवकरच स्टार प्रवाहावरील नव्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचं नाव अजून जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र प्रेक्षक तिला पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.