पिंपरी, ता. ८ ः मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातर्फे दिवाळीत दरवर्षी प्रकाश योजनेच्या माध्यमातून अद्वितीय अशा इतिहासातील लढाया दाखविल्या जातात. या वर्षी शिवरायांनी घडवून आणलेली मुघल सरदारांची जबरदस्त कोंडी ध्वनिचित्रफीत आणि प्रकाश योजनेच्या माध्यमातून शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी साकारली आहे. हे प्रदर्शन विनामूल्य असून १६ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे, या प्रदर्शनाचा लाभ इतिहास प्रेमींनी आणि सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन शाळेचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर यांनी केले आहे. मागील काही वर्षात पद्मदुर्ग प्रतिकृती, पानिपत लढाई, पालखेडची लढाई, कांचनबारी लढाई असे देखावे प्रस्तुत केले होते. ‘उंबर खिंड : एक जबरदस्त कोंडी’ या प्रकल्पाला शाळेचे औपचारिक शिक्षण प्रमुख शिवराज पिंपुडे यांनी मार्गदर्शन केले आहे. या प्रकल्पाची संहिता विद्यालयाचे अध्यापक अमेय गुर्जर यांनी लिहिली आहे. प्रतिकृती तयार करण्यासाठी रघुराज एरंडे, ऋषिकेश काळे यांनी मदत केली.
---