वडगाव मावळ, ता. ८ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ या २७व्या गळीत हंगामातील गव्हाण व मोळी पूजन समारंभ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते व श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे (इनामदार) यांच्या आधिपत्याखाली सोमवारी (ता. ११) दुपारी तीन वाजता होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली. दरम्यान, प्रत्यक्षात गळीत हंगामास सुरुवात शासनाच्या धोरणाप्रमाणे होईल, अशी माहिती त्यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर आयोजित या कार्यक्रमाला कारखान्याचे सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नवले यांनी केले आहे.
‘कारखाना कार्यक्षेत्रात पर्जन्यमान समाधानकारक झालेले असल्याने प्रतिहेक्टरी ऊस उत्पादकता वाढणार आहे. कारखान्यास पाच ते साडेपाच लाख मे. टन ऊस उपलब्ध होईल. त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी यंत्रणा भरली असून प्रतिदिनी चार ते साडे चार हजार मे. टन ऊस पुरवठा करून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केले असल्याने आपला ऊस कारखान्यास देवून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. ४५ के.एल.पी.डी. प्रतिदिन क्षमतेचा डिस्टिलरी (इथेनॉल) प्रकल्प उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे,’ अशी माहिती अध्यक्ष नवले यांनी दिली.
---