खेड-शिवापूर, ता. ८ : खेड-शिवापूर टोलनाक्यावर एसटी बस अडवून दोन मोटारचालकांसह चौघांनी बसचालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. ७) पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसचालक बापूराव भीमराव गावडे (वय ३७, रा. वडगाव हवेली, ता. कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार सुजित संजय खाटपे (वय २८, रा. वाठार, ता. भोर), अनिकेत पुंडलिक नवघणे (वय २६, रा. टिटेघर, ता. भोर) यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
बसचालक गावडे हे परळ ते खरसुंडी-सांगली ही बस घेऊन खेड-शिवापूर टोलनाक्यावरून जात होते. या वेळी सुजित खाटपे याने त्यांच्या ताब्यातील मोटार (क्र. एम. एच. १२ व्ही. एल. १३३८) व अनिकेत नवघणे याने त्याच्या ताब्यातील मोटार (क्र. एम. एच. १२ डब्ल्यू. के. ७५४९) या गावडे चालवत असलेल्या बसला आडव्या घालून बस थांबविली. ‘‘आमच्या कारला वाकड, पुणे येथे कट का मारला,’’ याची विचारणा करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली. या वेळी टोल नाक्यावरील दोन अनोळखी इसमांनीही शिवीगाळ करत गावडे यांना मारहाण केली. यामुळे गावडे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद राजगड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या गुन्ह्यातील दोन अनोळखी इसम टोलनाक्यावरील टपरीचालक होते, असे तपासात निष्पन्न झाले असून, हवालदार प्रमिला निकम तपास करत आहेत.