Ajit Pawar on Rahul Gandhi : "भारतात 15 टक्के दलित लोकसंख्या आहे. 8 टक्के आदिवासी आहेत. मात्र, आजपर्यंत कोणालाही माहिती नाही की, मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे? भारतातील संस्था पाहिल्या तर तिथे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय लोक दिसत नाहीत. त्यामुळे आम्ही म्हणत आहोत की, ऐतिहासिक निर्णय घेत जातीय जनगणना केली जावी. प्रत्येकाला समजले पाहिजे की, आपला वाटा किती आहे?" असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथील महाविकास आघाडीच्या सभेत केलं होतं. दरम्यान राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. "जातनिहाय जनगणना करणार म्हणे, यांच्या काकाने केली होती का? यांचं सरकार नाही अन् कुठून जनगणना करणार आहेत", असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले, आम्ही जेव्हा योजनांची घोषणा केली, तेव्हा विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की, या योजनांमुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीत जाईल. योजनांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत आणि या योजनांचे पैसे लोकांना मिळणार नाहीत. आता त्याच विरोधकांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक योजनांची घोषणा केली आहे. मात्र योजनांसाठी किती पैसे लागणार आणि ते कुठून आणणार याचा हिशोब माझा तोंडपाठ आहे, याउलट विरोधकांना याबाबत विचारलं असता त्यासाठी त्यांच्याकडे उत्तर नाही. विरोधकांनी जाहीर केलेल्या योजनांसाठी साडेतीन लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. आम्ही जाहीर केलेल्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. विरोधकांनी जाहीर केलेल्या योजना म्हणजे त्यांचा चुनावी जुमला आहे.
आजच्या घडीला एकूण गुंतवणुकीपैकी 52 टक्के गुंतवणूक ही फक्त महाराष्ट्रात झाली आहे. आधी महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होता, आता पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योगधंदे गुजरातला गेले असं फेक नरेटीव विरोधक जाणीवपूर्वक पसरवत आहेत. आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या नाहीत, त्या महाराष्ट्रातील इतर शहरांत स्थलांतरित झाल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 10 टक्के उमेदवार मुस्लिम समाजाकडून देण्यात आले आहेत. 12 टक्के जागा या प्रत्येकी एससी आणि एसटी समाजासाठी दिलेल्या आहेत. तसंच 10 टक्के जागा महिलांसाठी दिलेल्या आहेत. मी शब्द दिला होता; सर्व समाजांना पुढे घेऊन जाणार आणि तो मी पूर्ण करत आहे. विधान परिषदेत 2 जागा मिळाल्या, त्या सुध्दा ओबीसी आणि मुस्लीम समाजाला दिल्या. लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी-चिंचवड आणि भोसरी येथील महिलांना झाला आहे. महापुरुषांची नियोजित स्मारकं महाराष्ट्रात ठरल्याप्रमाणे उभारण्यात येतील. सार्वजनिक ठिकाणी बोलताना सकारात्मक बोला, आपल्या योजनांची माहिती द्या, असं आवाहन माझं पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Supriya Sule : 'तर कोर्टात खेचेन', सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा गोप्यस्फोट