निसर्गाशी नात्याचं 'बीज'
esakal November 14, 2024 11:45 AM

चंदना गाडे

मी मूळची हैदराबाद या शहरातील आहे. माझे शिक्षण हे मास्टर ऑफ कंप्युटर्समध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांनंतर माझे लग्न झाले आणि २०१४ मध्ये माझ्या मुलीचा जन्म दिला. त्यानंतर जगच बदलले. आई नेहमीच आपल्या पाल्याला सर्वोकृष्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असते. तेच मीही करत होते; पण मुलीच्या संगोपनादरम्यान मला काही गोष्टींची जाणीव झाली. उदाहरणार्थ, काही पदार्थ भेसळयुक्त असणे हे कायमच निदर्शनास येण्यास सुरुवात झाली. एका आईच्या काळजीपोटी मी यासाठी जास्त विचार करायला लागले आणि ही माझी तळमळ माझ्या पतींना म्हणजेच नवीनला दिसत होती.

तेव्हा मी त्याला सांगितले, की आपल्या मुलीसाठी आपण काही करूयात का? म्हणजे बाजारातील भाजीपाला, फळे यासाठी चांगल्या दर्जाचीच बियाणी वापरली जातात का? ते आपल्याला कसे कळेल? त्यातून मी आणि नवीननं आम्ही अनेक ठिकाणी शोध घेतला, काही प्रमाणात बाजार संशोधन केले. स्थानिक आणि ऑनलाइन मार्केटमध्ये देखील पाहिले; पण चांगल्या दर्जाच्या देशी बियाण्यांचे मार्केटच नव्हते. जी बियाणी उपलब्ध होती, त्यांचा दर्जाही समाधानकारक नव्हता.

म्हणून आम्ही २०१६ मध्ये ‘सीडबास्केट’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमचे मुख्य उद्दिष्ट होते लोकांना त्यांच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवायला प्रेरित करणे. त्यांच्या हाताने पिकवलेल्या भाजीपाल्याचा आनंद घेता यावा, हाच आमचा हेतू होता. ‘सीडबास्केट’मध्ये आम्ही भाजीपाला, फळे, फुले, ग्रो बॅग्ज आणि शेणखत उपलब्ध करून देतो. याशिवाय, आमच्याकडे पालेदार, पालेदार नसलेली, विदेशी, संकरित आणि सेंद्रिय प्रकारचे विविध बियाणे देखील आहेत.

भारतभर प्रचार आणि प्रसार

आज ‘सीडबास्केट’ हा भारतातील अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. ज्यावर लोकांना उत्तम दर्जाची बियाणी सहज मिळू शकतात. आम्हाला आनंद आहे, की आम्ही लोकांना सेंद्रिय शेती आणि घरच्या घरी पिकवलेल्या भाजीपाल्याचे महत्त्व पटवून देण्याचा एक भाग बनलो आहोत.

नवीनचा तांत्रिक आधार

‘सीडबास्केट’ सुरू करताना आम्हाला बऱ्याच आव्हानांना सामोरे लागले. व्यवसाय सुरू करण्याची कल्पना दोघांची असली, तरी त्याच्या तांत्रिक बाजूला आकार देण्यात नवीनचा मोलाचा वाटा आहे. नवीनला तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाची चांगली जाण असल्यामुळे, त्याने ‘सीडबास्केट’च्या सर्व तांत्रिक गोष्टी सांभाळल्या आहेत. सुरुवातीला वेबसाइट तयार करणे, तिला एक उत्तम ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म बनवणे, ग्राहकांसाठी ऑर्डर प्लेस करणे आणि ट्रॅकिंग करणे सोपे होण्यासाठी सर्व सोयी तयार करणे, ही सर्व कामे नवीनने उत्तमरीत्या केली. त्याने एक कार्यक्षम वितरण प्रणाली विकसित केली, ज्यामुळे आमच्या उत्पादनांचा दर्जा कायम राहतो आणि वेळेवर ग्राहकांपर्यंत पोहोचतो. आज ‘सीडबास्केट’च्या यशामध्ये नवीनच्या तांत्रिक योगदानाचा मोठा वाटा आहे. त्याच्या मदतीशिवाय हे शक्यच झाले नसते.

नवोदित महिला उद्योजिकांसाठी संदेश

प्रत्येक स्त्रीमध्ये एक उद्योजिका दडलेली असते, फक्त तिचा शोध घेण्याची आणि त्या क्षमता ओळखण्याची गरज असते. सुरुवात कधीच सोपी नसते; पण आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी धैर्य आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी आपली ओळख बनवायला वेळ लागतो; पण कधीही हार मानू नका. छोटी सुरुवात असली तरी चालेल; पण ती ठाम असावी. तुमच्या आवडीला व्यवसायात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा, कारण जिथे तुमचा उत्साह आणि मेहनत आहे, तिथे यश येईलच. मी सुरुवात खूप कमी भांडवलापासून केली होती. त्याचे आता मोठ्या उद्योगात रूपांतर झाले आहे. आजच्या डिजिटल युगात महिला उद्योजिकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य तंत्रज्ञान, मार्केटिंग आणि सोशल मीडिया यांचा वापर करा. तुमच्या उद्योगासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान मिळवा किंवा योग्य तांत्रिक मदत घ्या.

पतीचा आधार आणि सहकार्य

‘सीडबास्केट’च्या यशस्वी प्रवासामध्ये नवीनचा सहभाग आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. फक्त तांत्रिक गोष्टींचे ज्ञान देणे नव्हे, तर एक विश्वासू साथीदार म्हणून त्याने माझ्या प्रत्येक निर्णयात मला साथ दिली. मी काही नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न केला, तेव्हा नवीनने मला शिकण्यासाठी वेळ, प्रेरणा, आणि धैर्य दिले. एखादा निर्णय घेताना मी साशंक होत असे, तेव्हा नवीनने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन देऊन मला आधार दिला. त्याची व्यवस्थापनातील कुशलता आणि तंत्रज्ञानातील गती यामुळे व्यवसायातल्या आव्हानांना सामोरे जाताना मला धीर मिळाला. तसेच, व्यवसायाबद्दल मी खूप उत्सुक असले, तरी कुटुंब आणि व्यवसाय यांच्यात तोल राखायला नवीनने कायमच मला मदत केली.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.