Nawab Malik : अजित पवार हेच 'किंगमेकर' : नवाब मलिक
esakal November 14, 2024 11:45 AM

मुंबई : ‘‘राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का? मात्र वेगळे घडले. २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही. त्यामुळे अजित पवार हेच ‘किंगमेकर’ असणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.

‘‘राजकारणात सर्व नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. परंतु आज आमची इतकी ताकद नाही की, आम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी दावा करू शकतो. परंतु आम्ही ‘किंगमेकर’ बनणार आणि आम्हीच ठरवणार सरकार कसे बनवायचे आणि कुणाचे बनवायचे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली हे खरेच आहे. अजित पवार महाराष्ट्रातील एक मोठी ताकद आहे. निवडणूक निकालानंतर बघू.मात्र आमच्याशिवाय कोणच सरकार बनवू शकत नाही, असे ठाम मत मलिक यांनी व्यक्त केले.

‘‘आम्ही भाजपबरोबर असल्याची टीका महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात येत आहे. परंतु आमचे हा राजकीय समझोता असल्याचे अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. आम्ही आमची विचारसरणी सोडू शकत नाही. धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक व्यवस्था आम्हाला हवी आहे. आम्ही शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारसरणीशी जोडलेले आहोत. वेळेनुसार राजकीय समझोता राजकीय पक्ष करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा असे समझोते केले आहे. परंतु विचारसरणी कदापि सोडणार नाही. निवडणुकीनंतर आमच्या अटीवर येणारे सरकार बनेल,’’ असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.

माझा जामीन रद्द करण्यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपासून पक्षाची स्पष्ट भूमिका मांडत आहे आणि निवडणूकही लढवत आहे. जे लोक समजत होते नवाब मलिक हे राजकारणातून संपले पाहिजे. मात्र तो त्यांचा एक भ्रम होता.

- नवाब मलिक, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.