श्वेता कापसे
गेल्या आठ वर्षांपासून मी महिलांसाठी काम करत आहे. त्यावेळी माझे बाळ लहान असल्यामुळे मला त्यावेळी नोकरी किंवा व्यवसाय या दोघांमधील एक गोष्ट निवडायची होती. त्यावेळी नोकरीमध्ये अडकण्यापेक्षा ही माझी आवड जपत ज्वेलरी मेकिंगमधून व्यवसाय सुरू करायचे ठरवले. त्यासाठी सुरुवातीला हवे ते प्रशिक्षण घेतले आणि व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून मला अनेक महिलांशी ओळख झाली. त्यातून समजले, की अनेक महिलांना त्यांचे छंद जोपासायचे आहेत. त्यांच्याही अनेक आवडी आहेत.
मला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. मग मी महिलांनाही ज्वेलरी मेकिंगबद्दल प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी ऑनलाइन विक्री सुरू केली; तसेच आम्ही सर्वांनी मिळून प्रदर्शनेही भरवायला सुरुवात केली. अनेक महिला क्लाएंट्स आम्हाला मिळत गेल्या. त्यावेळी मला असे वाटले, की आपण या सर्व महिलांना घेऊन एक कम्युनिटी तयार करावी- जी कलांना प्रोत्साहन देईल. मग मी फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ‘कलासर्वदा’ हा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप तुमच्यातील कलांना उत्तेजन देतो. आतापर्यंत फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जवळजवळ आठ ते साडेआठ हजार महिला या ग्रुपला जोडलेल्या आहेत.
ग्रुप तयार करण्यामागचा हेतू हाच होता, की ज्यांच्यामध्ये विविध कला आहेत अशा सर्वजणी एका प्लॅटफॉर्मवर एकत्र होऊन एकमेकींच्या कलांची देवाणघेवाण करतील. यातून एकमेकींना फायदा तर होईलच- यासोबत त्या एकमेकींना त्यांच्या कला जोपासण्यासाठी मदत करतील. या ग्रुपच्या नावाप्रमाणेच कलांशी संलग्न ॲक्टिव्हिटी आम्ही इथे राबवत असतो. मध्यंतरी कोविडमध्ये ज्यावेळी सगळे ठप्प झाले होते, त्यावेळी महिलांना स्वयंपाक तर करावाच लागत होता. जग थांबले असले, तरी महिलांचे काम मात्र वाढले होते. यावेळी महिलांना मानसिक विरंगुळा मिळावा यासाठी आम्ही ग्रुपवर छान, मजेशीर अशा ॲक्टिव्हिटी सुरू केल्या.
उदाहरणार्थ, सणवार असले की घरात त्यादिवशी छान तयार होऊन ग्रुपवर फोटो शेअर करायचे, वेगवेगळ्या गेम्स घेणे, तसेच रॅम्प वॉक करून त्याचा व्हिडिओ शेअर करून ज्या व्हिडिओला सर्वांत जास्त लाइक येतील त्यांना आम्ही गिफ्ट पाठवून द्यायचो. अनेक महिला सदस्य घरगुती जेवणाचे डबे द्यायच्या. त्यांना या ग्रुपच्या माध्यमातून व्यवसाय मिळाला. या ग्रुपवर अनेक महिला त्यांचे व्यवसाय प्रमोट करतात, त्यामुळे त्यांना मदत होते.
महिलांशी कनेक्ट होताना मला असे समजले, की अनेक महिला म्हणायच्या की मी फक्त माझ्या लग्नामध्येच मेकअप केला होता. माझ्या लक्षात आले, की प्रत्येक महिलेला सजण्याची नटण्याची आवड असते. अशा महिलांसाठी आम्ही एक फॅशन शो आयोजित केला. त्यासाठी अनेक महिलांना मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करून छान छान ड्रेसेस देऊन त्यांचे फोटो शूट केले होते. हे सर्व करताना मला त्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून फार छान वाटत होते.
आपल्या कलेतून व्यावसायिक प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणातून अनेक महिलांना चार कामे मिळवून देणे, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बघणे ही गोष्ट मला फार छान वाटते. आम्ही राजगुरुनगरमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण भरवून ज्वेलरी मेकिंगमधले खूप बारकावे सांगितले होते. ज्यावेळी त्यांनी ती ज्वेलरी बनवली आणि ती अंगावर लेवून पाहिली, त्यावेळी त्यांना इतके छान वाटत होते, की आपणही इतकी सुंदर ज्वेलरी बनवू शकतो आणि याच्यातून पैसे कमवू शकतो, घर सांभाळू शकतो. या सर्वांतून त्यांचा आम्हाला जो फीडबॅक आला, तो फारच सुंदर होता. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला.
जेव्हा आपण कोणतेही काम सुरू करतो, वा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा त्यात सातत्य ठेवा, एवढेच मला महिलांना सांगावेसे वाटते.
(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)