देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेल्या ‘एसआयपी’च्या (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मार्गाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याच्या पद्धतीने एक मोठा टप्पा नुकताच गाठला आहे. गेल्या महिन्यात म्हणजे आॅक्टोबरमध्ये ‘एसआयपी’ने तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा मैलाचा दगड ओलांडला आणि त्याच महिन्यात ‘एसआयपी फोलिओं’च्या संख्येने दहा कोटींचा मोठा टप्पाही पार केला. म्युच्युअल फंडाच्या इतिहासात या दोन्ही गोष्टींची विशेष दखल घ्यावी लागेल. कारण २० हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केल्यानंतरच्या अवघ्या सहा महिन्यांत २५ हजार कोटींची मजल गाठली गेली. एकीकडे चलनवाढ होत असताना बॅंकेतील बचत खात्यावरील व्याजदर त्याहीपेक्षा कमी असताना सर्वसामान्यांना संपत्तीनिर्मितीचे कमी पर्याय उपलब्ध असतात.
‘एसआयपी’ हा त्यातला सर्वांत आकर्षक पर्याय. पूर्वीच्या काळी शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त तेजी दिसायला लागली, की परदेशी वित्तीय संस्था (एफआयआय) वरच्या भावात शेअरविक्रीचा मारा करत असत आणि त्यामुळे बाजार धपाधप कोसळत असे. अशा स्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदार हतबलतेने या परिस्थितीला सामोरा जात असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. ‘एसआयपी’रूपी पैशांचा ओघ आपल्या बाजारातील घसरणीला थोपवून धरत आहे. बँका वा पोस्टातील पारंपरिक गुंतवणुकीपलीकडचे इतरही गुंतवणूकपर्याय आपल्याला अधिक परतावा मिळवून देऊ शकतात, त्यासाठी थोडी ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ घ्यावी लागते, याची परिपक्वता गुंतवणूकदारवर्गात येऊ लागली, त्यात मध्यमवर्गीयांची संख्या मोठी आहे.
गेल्या काही काळात शेअर बाजारात होत असलेल्या घसरणीची फारशी चिंता न करता गुंतवणूकदारांकडून ‘एसआयपी’च्या माध्यमातून बाजारात पैसा ओतला जात आहे, हे विशेष. चलनवाढीवर मात करण्यापलीकडचा परतावा (रिटर्न्स) मिळाला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ होत असतो, याची जाणीव आता सर्वसामान्यांना होऊ लागल्याचे यातून प्रतीत होते आहे. इंटरनेटसह विविध प्रसिद्धी माध्यमे, समाजमाध्यमे यांतून होत असलेल्या माहितीच्या प्रसवामुळे जनजागृती वाढत चालली आहे. भांडवली बाजार (कॅपिटल मार्केट) या संकल्पनेविषयी, त्यातून मिळणाऱ्या परताव्याविषयी सजगता वाढली आहे.
पाल्यांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची तरतूद, मुला-मुलींच्या विवाहासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद, निवृत्तीनिधी तयार करणे, ही उद्दिष्टे जवळजवळ प्रत्येक कुटुंबासमोर असतात. घसरते व्याजदर आणि वाढती चलनवाढ (महागाई) अशा कात्रीत सापडणारा सर्वसामान्य नागरिक सातत्याने आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा कसा मिळवता येईल, याचा शोध घेताना दिसतो. बँक वा पोस्टातील ठेवींवर मिळणारा ७-८ टक्क्यांपर्यंतचा व्याजदर आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा मिळवून देत नाही, त्यामुळे आपल्या जीवनातील जबाबदाऱ्यांची पूर्तता वा स्वप्नपूर्तीसाठी महागाईच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळाला तरच ही गोष्ट साध्य होऊ शकते, हे आता समजू लागले आहे.
कारण सरकारकडून जाहीर केला जाणारा सार्वत्रिक चलनवाढीचा दर जरी ६-६.५ टक्क्यांच्या आसपास असला तरी दैनंदिन जीवनावश्यक खाद्यपदार्थ, शैक्षणिक खर्च वा वैद्यकीय खर्च यांच्यात होत चाललेली चलनवाढ वेगळे आकडे दर्शवते. या सर्वांच्या वाढीचे आकडे दुहेरी आकड्यांत म्हणजे १० ते १४ टक्क्यांच्या पातळीत आहेत. ही छुपी चलनवाढ अप्रत्यक्षरीत्या तुमच्या संपत्तीच्या वाढीतील अडथळा असते. त्यामुळे सद्यःस्थितीचा विचार करता, जोपर्यंत १४ टक्क्यांपैक्षा अधिक परतावा मिळत नाही, तोपर्यंत आपली संपत्तीनिर्मिती होऊ शकत नाही, हे कटूसत्य आहे. त्याकडे डोळसपणे पाहून उपाय शोधण्याची गरज आहे. शोधाच्या या प्रवासात इक्विटी फंडातील ‘एसआयपी’च्या रुपाने आशेचा किरण दिसत गेला आणि या किरणांनी भांडवली बाजाराचे विश्व वेगळ्या अर्थाने व्यापल्याचे चित्र दिसत आहे. शिस्तबद्ध, नियमित आणि सोप्या पद्धतीने होणारी ही गुंतवणूक भांडवली बाजारातील तज्ज्ञांच्या हातात दिली जाते आणि त्यांच्या व्यावसायिक कौशल्याद्वारे मिळणाऱ्या लाभाची फळे सर्वसामान्यांना चाखायला मिळतात.
थेट शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्वतःला खूप अभ्यास करण्याची गरज असते; शिवाय जोखीमही अधिक असते. मात्र, ‘एसआयपी’च्या मार्गाने म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याने ‘रूपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’ आणि ‘चक्रवाढीची ताकद’ यांची जोड मिळू शकते आणि त्यातून दीर्घकाळात संपत्तीनिर्मिती होऊ शकते.इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था निश्चितच उजवी आहे. तिने प्रगतीची, विकासाची दिशाही पकडली आहे. त्याचेच प्रतिबिंब आपल्या भांडवली बाजारात उमटत आहे.परकी वित्तीय संस्थांना विश्वास आहे, मग आपल्या लोकांना का असू नये? तो विश्वास आता गुंतवणुकीच्या वाढत्या प्रवाहातून दिसून येत आहे.